LIVE UPDATES

आता 'या' खाजगी रुग्णालयांतही मिळणार मोफत उपचार

आयुष्मान कार्डधारकांसाठी मोठी बातमी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 28, 2026 20:15 PM
views 434  views

कुडाळ : केंद्र सरकारच्या 'आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजने'मुळे सर्वसामान्यांना खाजगी रुग्णालयांमधील महागडे उपचार आता मोफत मिळणे शक्य झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामांकित खाजगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, प्रशासनाकडून अशा रुग्णालयांची अद्ययावत यादी जाहीर करण्यात येणार आहे.

या योजनेमुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांवरील उपचार आता खाजगी रुग्णालयात एकही रुपया खर्च न करता घेता येणार आहेत.

योजनेत समाविष्ट जिल्ह्यातील प्रमुख खाजगी रुग्णालये:

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील खालील प्रमुख खाजगी रुग्णालयांमध्ये आयुष्मान कार्डवर उपचार मिळणार आहेत:

कुडाळ परिसर: सुयश हॉस्पिटल, कोकण कॅन्सर आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल.

कणकवली परिसर: संजीवन हॉस्पिटल, गुरुकृपा हॉस्पिटल, एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, डॉ. नागवेकर हॉस्पिटल अँड नर्सिंग होम, विवेकानंद नेत्रालय, श्रीराम हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम.

सावंतवाडी/नेरूर: डॉ. गद्रे आय केअर सेंटर, चितारी हॉस्पिटल अँड क्रिटिकेअर सेंटर, राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, ब्र. नाथ पै शिक्षण संस्था संचलित यशवंतराव नाईक रुरल हॉस्पिटल (नेरूर).

मालवण/देवगड: अंकुर हॉस्पिटल, झांट्ये क्लिनिक (मालवण).

५ लाखांपर्यंतचे कवच

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. यामध्ये औषधे, शस्त्रक्रिया, निदानासाठी लागणाऱ्या चाचण्या आणि रुग्णालयातील वास्तव्याचा खर्च समाविष्ट असतो. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी या योजनेत सहभाग घेतल्यामुळे स्थानिक नागरिकांना उपचारासाठी कोल्हापूर किंवा मुंबईसारख्या शहरांकडे धाव घेण्याची गरज आता कमी होणार आहे.

नागरिकांनी काय करावे?

१. उपचारासाठी जाताना आपले 'आयुष्मान कार्ड' सोबत ठेवावे.

२. संबंधित खाजगी रुग्णालयातील 'आयुष्मान मित्र' यांच्याशी संपर्क साधून उपचारांची प्रक्रिया समजून घ्यावी.

३. जर कार्ड नसेल, तर जवळच्या सेतू केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन आपली पात्रता तपासून घ्यावी.