माणगाव आरोग्य केंद्रात MBBS डॉक्टर दाखल

सामाजिक कार्यकर्ते दीपक काणेकर यांच्या आंदोलनाचा परिणाम
Edited by: रवींद्र जाधव
Published on: January 10, 2026 17:06 PM
views 434  views

सिंधुदुर्ग : गेली काही वर्षे माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसल्यामुळे तेथे विदारक परिस्थिती होती. माणगाव खोऱ्यातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. माणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे ओबीसी जिल्हा सरचिटणीस  ॲड. दीपक जयराम काणेकर  यांनी याबाबत उठाव केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी व  जिल्हा आरोग्य अधिकारी सौ. सई धुरी यांच्याशी चर्चा करून तेथील समस्यांबाबत सांगितले होते. अखेर ९ जानेवारी रोजी येथे एमबीबीएस डॉक्टर कृष्णा लोमटे दाखल झाले असून त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली आहे. याबाबत श्री. काणेकर यांचे ग्रामवासीय आभार व्यक्त करीत आहेत. 

माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एमबीबीएस डॉक्टरची मागणी प्रलंबित होती. भाजपचे ओबीसी जिल्हा सरचिटणीस ॲड. दीपक काणेकर यांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा माणगाव आरोग्य केंद्रामध्ये बैठका पार पडल्या. त्याला अनुसरून त्यांच्या या मागणीला एक महिन्यांमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घेऊन माणगाव खोऱ्यासाठी एमबीबीएस डॉक्टर कृष्णा लोमटे यांनी कार्यभार स्वीकारला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व  जिल्हा आरोग्य अधिकारी सौ. सई धुरी यांच्या सहकार्यामुळे एमबीबीएस डॉक्टर माणगाव  येथे रुजू झाले आहेत. त्यावेळी दीपक काणेकर यांनी या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांचे आभार मानले.  

यावेळी नव्याने रुजू झालेले डॉक्टर कृष्णा  लोमटे यांचा शाल व श्रीफळ देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. लोमटे म्हणाले की, येथील सर्व समस्या सोडविल्या जातील. नागरिकांनी आपल्याला सहकार्य करावे. त्यांनी कोणतीही काळजी करू नये.

यावेळी  माणगावचे माजी उपसरपंच सचिन परब,  विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाळू धुरी, सौ. लतिका गावडे,  बाळा कोरगावकर,  राजन तानावडे, अरविंद परब, बाळू केरकर.  पांडुरंग जोशी  उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी घेतली दखल

पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत दखल घेतली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी सौ. सई धुरी यांनी पाठपुरावा केल्यामुळे माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर दाखल झाले आहेत. त्यामुळे केंद्रातील अनेक समस्यांना वाचा फुटेल अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.