LIVE UPDATES

Khed News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड

प्रशासनाच्या तत्परतेने खात्यात ५ हजार जमा ; वाळंजवाडीतील शेतकरी राजेंद्र महाडिक यांनी मानले शासनाचे आभार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 09, 2026 06:57 PM
views 48  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

रत्नागिरी(भरत केसरकर): यंदा पावसाअभावी शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून ऐन सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. खेड तालुक्यातील वाळंजवाडी (कळंबणी बुद्रुक) येथील शेतकरी राजेंद्र शिवाजी महाडिक यांच्या बँक खात्यात नुकसानीपोटी ५ हजार रुपयांची मदत थेट जमा झाली असून, त्यांनी कृषी प्रशासन आणि राज्य सरकारचे मनापासून आभार मानले आहेत.

 चालू हंगामात पावसाच्या कमतरतेमुळे वाळंजवाडी व परिसरातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हतबल झालेल्या शेतकऱ्यांची दखल घेत स्थानिक कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने बांधावर जाऊन पाहणी केली व नुकसानीचे अचूक पंचनामे करून तत्काळ शासनाकडे अहवाल सादर केला.

प्रशासनाच्या या जलद गतीमुळे कोणत्याही विलंबाविना ऐन दिवाळीच्या तोंडावर ५ हजार रुपयांची आर्थिक मदत 'दिवाळी भेट' म्हणून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. या मदतीमुळे ऐन सणात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे.

 "या वर्षी पावसाअभावी आमच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र, येथील कृषी अधिकाऱ्यांनी वेळेत शेतात येऊन नुकसानीची पाहणी केली आणि हा अहवाल शासनापर्यंत पोहोचवला. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे शासनाकडून दिवाळी भेट म्हणून ५ हजार रुपये आमच्या बँक खात्यात थेट जमा झाले आहेत. या संकटसमयी दिलेल्या मदतीबद्दल आम्ही सरकारचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो." अशी भावना राजेंद्र शिवाजी महाडिक शेतकरी, वाळंजवाडी, कळंबणी बुद्रुक, ता. खेड यांनी व्यक्त केली आहे.