LIVE UPDATES

अंशकालीन स्त्री परिचरांच्या खात्यात भाऊबीज अनुदान जमा होण्यास सुरुवात

रावजी यादव यांच्या यशस्वी पाठपुराव्याला यश
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 09, 2026 07:42 PM
views 52  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

देवगड : गतवर्षी तांत्रिक अडचणींमुळे भाऊबीज अनुदानापासून वंचित राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परिचरांच्यासाठी आनंदाची बातमी आहे,

 महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी गंगाराम यादव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे, या महिला भगिनींच्या बँक खात्यात भाऊबीज अनुदान जमा होण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या दिलासादायक बातमीमुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी गतवर्षी आपल्या पहिल्याच जनता दरबारात अंशकालीन स्त्री परिचरांच्या समस्यांचे निवेदन स्वीकारले होते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी स्वतः बैठक घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्याबाबतचे इतिवृत्तही मंजूर करण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे गतवर्षी या भगिनींना भाऊबीज मिळू शकली नव्हती.

हा प्रश्न रेंगाळू न देता महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी गंगाराम यादव यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अत्यंत प्रभावी पाठपुरावा केला. त्यांनी विद्यमान आरोग्य सभापती प्रितेश राऊळ तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विद्यमान लोकप्रतिनिधी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती) यांच्याशी सविस्तर चर्चासत्रे घडवून आणली. रावजी यादव यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि दिलेल्या आश्वासनानुसार अखेर भाऊबीज अनुदानाची रक्कम सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा झाली असून, आता ती थेट संबंधित भगिनींच्या बँक खात्यात वर्ग केली जात आहे.

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी आणि प्रशासन अधिकारी एन. पी. मठकर (जि.प. सिंधुदुर्ग) यांचे मोलाचे व सहकार्याचे योगदान लाभले, ज्यामुळे हा तिढा सुटण्यास मदत झाली.

या सर्व घडामोडींमुळे अंशकालीन स्त्री परिचर महिला वर्गामध्ये समाधानाची भावना असून, महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी गंगाराम यादव यांच्यासह मनिषा परब (माजी अध्यक्ष), अमृता तोरसोळकर (अध्यक्ष), सुचित्रा मुणगेकर, अक्षता शेडगे, सुशीला आयीर आणि चैत्राली तळवडेकर आदींनी या सर्वांचे जाहीर आभार मानत ऋणी असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,