
राजापूर : आपल्या सिद्धहस्त लेखणीतून मालवणी बोलीभाषेला सातासमुद्रापार पोहोचवणारे आणि मालवणी भाषेला जागतिक रंगभूमीवर मानाचे स्थान मिळवून देणारे राजापूर तालुक्यातील माडबन गावचे सुपुत्र, ज्येष्ठ नाटककार तथा ‘वस्त्रहरण’कार कै. गंगाराम महादेव गवाणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त २८ ऑक्टोबर रोजी मालवण येथे विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘अशा या दोघी’ या दोन अंकी नाटकाचा विशेष प्रयोग सादर करण्यात येणार असून, ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
मालवणच्या मातीशी अतूट नाते जपणाऱ्या गवाणकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात हा विशेष सोहळा रंगणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कै. गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्या जीवनप्रवासातील आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या नाट्यलेखनाचा आणि मालवणी भाषेच्या प्रचार-प्रसारातील योगदानाचा गौरव करण्यात येईल. त्यानंतर लगेचच ‘अशा या दोघी’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.
अष्टपैलू कलानिकेतन आयोजित आणि देऊळकर प्रॉडक्शन निर्मित या नाटकाची निर्मिती रोहिणी रवींद्र देऊळकर यांनी केली आहे. कै. गवाणकर यांचे परममित्र आणि ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र देवधर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांची उपस्थिती. रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेत राजा दशरथ यांची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेल्या धुरी यांच्या उपस्थितीत कै. गवाणकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘अशा या दोघी’ या नाटकात राजेंद्र कदम, कुणाल आंगणे, संजीव शेडगे, योगिता सावंत, जितू तिरोडकर आणि मिनू देऊळकर हे कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत. प्रफुल्ल गोसावी यांनी नाटकाला संगीत दिले असून, धनश्री कुमठेकर यांनी प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली आहे. जितू तिरोडकर यांनी रंगभूषा केली असून, सुजाता शेलटकर आणि सुनील परुळेकर यांनी निर्मिती सहाय्य केले आहे.
नाट्यप्रेमींसाठी विनामूल्य प्रयोग
कै. गंगाराम गवाणकर यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या मालवण येथील कलाकार आणि त्यांच्या मित्रपरिवाराने या स्मृतिसोहळ्याचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, हा नाट्यप्रयोग सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
मालवणसह संपूर्ण कोकणातील नाट्यप्रेमींना आपल्या लाडक्या नाटककाराच्या स्मृतींना अभिवादन करण्याची ही संधी असून, रसिकांनी सायंकाळी ६ वाजल्यापासून मामा वरेरकर नाट्यगृहात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भावपूर्ण आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








