
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेला उद्योगाचे स्वरूप देत स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे आणि पर्यटनपूरक व्यवसायांसाठी स्वतंत्र कर्जधोरण व सुलभ अर्थसहाय्याच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना बळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पर्यटनातून निर्माण होणारा आर्थिक लाभ स्थानिकांपर्यंत पोहोचवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणे आणि जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला चालना देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख केवळ समुद्रकिनारे, किल्ले, निसर्गसौंदर्य आणि सांस्कृतिक परंपरेपुरती मर्यादित राहू नये, तर या पर्यटन क्षमतेचे रूपांतर स्थानिकांच्या उत्पन्नात आणि रोजगारात व्हावे, या दृष्टिकोनातून जिल्हा बँकेने पर्यटन क्षेत्राकडे पाहण्यास सुरुवात केली.
पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना आर्थिक पाठबळ देणे म्हणजे केवळ एखाद्या व्यावसायिकाला कर्ज देणे नव्हे, तर त्यातून संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देणे, ही भूमिका या धोरणामागे होती. हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे, कॉटेज तसेच पर्यटनाशी निगडित विविध प्रकल्पांना कर्जपुरवठ्याची दारे खुली झाल्याने स्थानिक उद्योजकांना आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष व्यवसायाचे स्वरूप देण्याची संधी मिळाली.
‘सिंधुरत्न समृद्ध’सारख्या पर्यटन प्रकल्पांमध्ये लाभार्थ्यांच्या गुंतवणुकीसाठी जिल्हा बँकेमार्फत कर्जपुरवठ्याची भूमिका राहिली आहे. याचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे पर्यटनातून निर्माण होणारा पैसा स्थानिक अर्थव्यवस्थेतच फिरू लागणे. एखाद्या होमस्टेमुळे केवळ त्या कुटुंबाचे उत्पन्न वाढत नाही. त्यासाठी स्थानिक भाजीपाला, मासे, फळे, मसाले, हस्तकला, वाहतूक, स्वच्छता आणि इतर सेवांची मागणी वाढते. त्यामुळे एका पर्यटन प्रकल्पाभोवती अनेक छोट्या व्यवसायांना अप्रत्यक्ष रोजगार आणि बाजारपेठ मिळते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








