
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इशान किशन भारतीय संघासाठी खेळू शकणार नाही आहे. पहिल्या टी-२० सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो दुसऱ्या टी-२० सामन्यातून अधिकृतपणे बाहेर झाला होता आणि आता तो तिसऱ्या सामन्यातही खेळू शकणार नाही.
भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे. विशेषतः कारण तो सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. संघ व्यवस्थापन त्याला सावरण्यासाठी पुरेसा वेळ देऊ इच्छिते. त्यामुळे, दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी त्याच्या जागी संघात समाविष्ट केलेला खेळाडू तिसऱ्या सामन्यासाठीही संघासोबत वेलिंग्टनला गेला आहे.
सोमवारी २६ ऑक्टोबरच्या सकाळी बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवरून माहिती दिली. यामध्ये "न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान इशान किशनला उजव्या 'ॲडक्टर' स्नायूमध्ये (adductor strain) दुखापत झाली होती. यातून तो आता सावरत आहे. तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे २७ ऑक्टोबर २०२६ रोजी वेलिंग्टन येथे होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यातून त्याला वगळण्यात आले आहे. बीसीसीआयची मेडीकल टीम त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी कुमार कुशाग्रा संघासोबतच राहणार आहे."
पहिल्या टी-२० सामन्यात इशान किशनला दुखापत झाल्यानंतर तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. किशन मधल्या फळीत फलंदाजी करत होता. दुसऱ्या दिवशी, भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी संकेत दिले होते की किशन पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि तो कदाचित दुसरा सामना खेळू शकणार नाही. त्यानंतर लगेचच बीसीसीआयने अधिकृतपणे जाहीर केले की इशान किशन दुसऱ्या टी-२० सामन्यातून बाहेर झाला आहे. या घोषणेनंतर काही वेळातच बोर्डाने त्याच्या बदली खेळाडूचीही घोषणा केली.
Update Ishan Kishan is recovering well from his low grade right adductor strain, which he sustained during the first T20I of the series against New Zealand. He is yet to regain match fitness and is ruled out of the third T20I to be played on October 27, 2026 in Wellington. The BCCI Medical Team is monitoring Ishan's progress. Kumar Kushagra will continue to be with the team for the third T20I. #TeamIndia | #NZvIND
— BCCI (@BCCI) October 26, 2026
डाव्या हाताचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनच्या जागी कुमार कुशाग्राला भारताच्या टी-२० संघात बॅकअप यष्टिरक्षक म्हणून समाविष्ट करण्यात आले. तो अधिकृतपणे दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघात सामील झाला आणि त्यानंतर ख्राइस्टचर्चहून वेलिंग्टनला जाणाऱ्या पथकासोबत प्रवास केला. जिथे तिसरा सामना होणार आहे. या सामन्यातही तो राखीव यष्टिरक्षक म्हणून कायम राहील आणि इशान किशन बाहेरच बसेल, अशी अपेक्षा होती. बीसीसीआयने आता यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








