LIVE UPDATES

आदिनाथ - उर्मिला कोठारे झाले वेगळे !

16 वर्षांच्या नात्याला पूर्णविराम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 17, 2026 13:11 PM
views 631  views

Adinath-Urmilla Kothare Divorce: मराठीमधील प्रसिद्ध जोडपं आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांनी अखेर आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून यााबाबतची माहिती दिली. त्यांनी आम्ही हा निर्णय सामंजस्यानं घेत आहोत असं देखील सांगितलं. याचबरोबर ते एकत्रितपणे त्यांची मुलगी जिजाचा सांभाळ आणि संगोपन करणार आहेत असं देखील सांगितलं.

आदिनाथ कोठारे आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतो, "आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो,

खूप विचार केल्यानंतर, आम्ही, आदिनाथ म. कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिज़ा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत.'

आदिनाथ पुढे लिहितो की, आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील.

गेल्या काही वर्षांत मीडिया आणि तुम्हा सगळ्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे, त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहतील, अशी आम्हाला आशा आहे.

म्हणूनच, आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा (Privacy) आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद."

आदिनाथ आणि ऊर्मिला

आदिनाथ आणि उर्मिला यांचे लग्न डिसेंबर २०११ रोजी शाही थाटामाटात झालं होतं. उर्मिला आणि आदिनाथ यांची पहिली भेट 2006 मध्ये शुभ मंगल सावधान या चित्रपटाच्या शुटिंगवेळी झाली होती. त्या भेटीचे नंतर मैत्रीत अन् प्रेमात रूपांतर झालं. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला.लग्नानंतर २०१८ मध्ये त्यांच्या आयुष्यात जिजा ही त्यांची मुलगी आली. त्यानंतर हे स्टार कपल गुण्या गोविंदाने नांदत होते. मात्र गेल्या बऱ्याच काळापासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही मतभेद असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या.