
सिंधुदुर्गनगरी : जलजीवन मिशनअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३ पाणीपुरवठा योजनांची कामे शंभर टक्के पूर्ण झालेली असतानाही संबंधित ठेकेदारांची बिले अद्याप अदा करण्यात आलेली नसल्याचा मुद्दा बुधवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत चांगलाच गाजला. विशेष म्हणजे या कामांसाठी जिल्हा परिषदेकडे जवळपास साडेसहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असताना बिले का रखडली, असा सवाल उपस्थित करत समिती सदस्य मनोज रावराणे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी स्वतः लक्ष घालून येत्या दोन दिवसांत सर्व देय बिले अदा करण्याची ग्वाही दिली.
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा बुधवारी (२ सप्टेंबर) अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष दादा साईल, सभापती संतोष साठविलकर, अनुराधा नारकर, रुहिता तांबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, समिती सदस्य मनोज रावराणे, सुनील पारकर, सुप्रिया वालावलकर, आरती पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश राणे आदी उपस्थित होते.
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ठेकेदारांनी प्रतिकूल परिस्थितीत पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण केली आहेत. यातील ३३ कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. काही योजना मात्र विद्युत पुरवठ्याअभावी अद्याप कार्यान्वित झालेल्या नाहीत. या योजनांसाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटी ७६ लाख रुपये, तर अनुसूचित जाती-जमाती घटकासाठी १ कोटी ८० लाख रुपये असा निधी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला आहे. निधी उपलब्ध असतानाही ठेकेदारांची बिले प्रलंबित असल्याबाबत रावराणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“कामे पूर्ण झाली, निधी उपलब्ध आहे; मग ठेकेदारांची बिले का थांबली?” असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर अध्यक्ष प्रमोद कामत यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन दोन दिवसांत बिले अदा करण्याचे आश्वासन दिले.
दूषित पाण्यावरून सभेत संतापाचा उद्रेक
दरम्यान, जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आढळलेल्या दूषित पाणी नमुन्यांवरून सभेत सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय, आरोग्य केंद्रे तसेच शाळांमधील पाण्याचे नमुने दूषित आढळल्याची माहिती सभेत समोर आली.
विशेष धक्कादायक बाब म्हणजे डायलिसिस युनिटलाही पुरवठा होणारे पाणी दूषित आढळल्याचे बैठकीत उघड झाले. रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या आरोग्य संस्थांमध्येच दूषित पाणी वापरले जात असल्यास रुग्णांसह डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता सदस्यांनी व्यक्त केली. संबंधित पाणी स्रोतांचे तातडीने शुद्धीकरण करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिले.
योजना पूर्ण, पण नळाला अजून पाणी नाही!
रानबांबुळी गावात जलजीवन मिशनअंतर्गत काही कामे पूर्ण झाली असली तरी अद्याप ग्रामस्थांना या योजनांचा प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. काही ठिकाणी विद्युत पुरवठ्याअभावी योजना कार्यान्वित होत नसल्याचा मुद्दा सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी उपस्थित केला. केवळ काम पूर्ण दाखविण्यापेक्षा ग्रामस्थांच्या घरापर्यंत प्रत्यक्ष पाणी पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धरणे, पाझर तलावांची तातडीने तपासणी करा
नेपाळमध्ये झालेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाझर तलाव, धरणे आणि मोठ्या जलप्रकल्पांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. जिल्ह्यातील सर्व जलसाठ्यांची तातडीने पाहणी व ‘इन्स्पेक्शन’ करून त्याचा अहवाल समितीसमोर सादर करण्याचे आदेश अध्यक्ष प्रमोद कामत यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
जलजीवन मिशनची रखडलेली बिले, दूषित पाण्याचा गंभीर प्रश्न आणि धरणांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाला दिलेले निर्देश यामुळे बुधवारी झालेली जलव्यवस्थापन समितीची सभा चांगलीच गाजली.












