
कुडाळ : कुडाळ एमआयडीसी परिसरातील बजाज राइस मिल शेजारील २७ गुंठे कमर्शियल प्लॉटच्या मालकीवरून, वापरावरून आणि परप्रांतीयांना दिलेल्या कथित जागेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. आगामी ४ सप्टेंबर २०२६ रोजी रामदेव चौक येथे 'समस्त राजस्थानी विष्णू समाज, कुडाळ' यांच्या वतीने 'बाबा रामदेवजी मंदिर आणि श्री रामदेव सभाभवन' यांच्या भूमिपूजन, हवन व पाया भरणी मुहूर्ताचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, आवश्यक परवानग्या मिळवण्यापूर्वीच प्लॉटचे सपाटीकरण करण्यात आल्याने या प्रकरणाने गंभीर रूप धारण केले आहे.
एमआयडीसी प्रकल्पग्रस्त विनय गावडे यांनी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्थानिकांनी कवडीमोल दरात जमिनी दिल्यानंतरही स्थानिकांना उद्योग उभारण्यासाठी जागा मिळत नाही, तर परप्रांतीयांना सहज जागा कशी मिळते, असा सवाल त्यांनी केला. या कमर्शियल जागेत कोणतेही हॉल किंवा मंदिर उभारण्यास तीव्र विरोध असेल, अशी भूमिका त्यांनी घेतली.
दुसरीकडे, जागेचे मालक अर्जुन गिरी गोस्वामी यांनी हा २७ गुंठे कमर्शियल प्लॉट ३ महिन्यांपूर्वी पैसे भरून रीतसर व कायदेशीर कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच खरेदी केल्याचे स्पष्ट केले असून तिथे कमर्शियल हॉल बनवण्यात येणार असल्याचे सांगितले.
या संपूर्ण प्रकारावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी एमआयडीसी उपअभियंता अविनाश रेवंडकर यांना धारेवर धरले. स्थानिकांना अर्ज करूनही जमिनी उपलब्ध नसल्याचे सांगत असताना बाहेरून आलेल्यांना जमिनी कशा मिळतात, असा जाब विचारण्यात आला. तसेच जमीन मालकाला अजून प्रत्यक्ष ताबा किंवा हस्तांतरण झाले नसताना खरेदी करणाऱ्यांनी प्लॉटचे सपाटीकरण व वृक्ष तोड कसे केले, या प्रश्नावर अधिकारी कोणतेही समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत.
वादानंतर प्रशासकीय पातळीवर तातडीने हालचाली झाल्या. नेरूळ मंडळाधिकारी व तलाठी यांना बोलावून जमिनीवरील मातीचे उत्खनन व त्याचे कायदेशीर पंचनामे करण्यात आले. तसेच कुडाळ वनक्षेत्रपाल अधिकारी चेतन पाटील यांना बोलावून जमिनीवर झालेली वृक्षतोड दाखवण्यात आली. या सर्व घडामोडींच्या वेळी संजय कसबे, प्रशांत मसुरकर, अभय शिरसाट, विजय प्रभू, अमरसेन सावंत, बबन बोभाटे, मंदार शिरसाट, कृष्णा धुरी, बाळा पावसकर, अमित राणे, गुरु गडकर, अतुल बंगे, अजित मार्गी, प्रभाकर गावडे, दीपक गावडे, रामा कांबळी, स्वप्निल गावडे, महेश गावडे, केदार गावडे, भूषण गावडे, कृष्णा मराठे, राजन धोंड, विनय गावडे, बाबी आळवे, श्रीधर कोरजुवेलर, प्रथमेश गावडे, योगेश धुरी, सुशील चिंदरकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रकरणी प्रशासनाकडून पुढे काय कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.












