
वैभववाडी : विवाहित महिलेवर सात महिने अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. या गुन्ह्यात संशयित विक्रांत रणजित पवार याने वापरलेली दुचाकी पोलिसांनी शुक्रवारी (ता. ९) जप्त केली. तसेच या गुन्ह्याच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथकही वैभववाडीत दाखल झाले होते.
तालुक्यातील एका विवाहित महीलेवर सामुहिक अत्याचार करण्यात आला. सात महीने हा प्रकार सुरू होता. अखेर पिडित महीलेने ६ ऑक्टोबरला वैभववाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या प्रकरणी खांबाळे येथील विक्रांत रणजित पवार (वय २२), अक्षय कमलाकर चव्हाण (वय २८), परेश पंढरीनाथ साईल (वय २५) आणि तुषार सुरेश कर्पे (वय २४, सर्व रा. खांबाळे, ता. वैभववाडी) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत चौघांनाही अटक केली. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस कोठडीदरम्यान या प्रकरणातील तपासात आणखी काही गोष्टींचा उलगडा झाला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत संशयित विक्रांत पवार याने दुचाकीवरून येऊन पीडित महिलेला धमकी दिली होती. ती दुचाकीही पोलिसांनी शुक्रवारी जप्त केली. तसेच या गुन्ह्याशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकानेही वैभववाडीत येऊन तपास केला. त्यांच्याकडूनही काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा वैभववाडी पोलीस कसून तपास करत असून, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.














