LIVE UPDATES

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साटेली-भेडशीत श्रमदानातून ६ वनराई बंधारे

पाणी संवर्धनासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 08, 2026 20:20 PM
views 32  views

दोडामार्ग : पाणीटंचाई व दुष्काळ परिस्थितीच्या दृष्टीने पाण्याचे संवर्धन करण्यासाठी साटेली भेडशी ग्रामपंचायत यांच्या नियोजनाखाली ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळांमधील शिक्षक विद्यार्थी, पं.स.सदस्य, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गट, महिला ग्रामसंघ, ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थितीत श्रमदानाने गुरुवारी साटेली भेडशी येथे एकूण सहा बंधारे घालण्यात आले.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ग्रामपंचायतच्या वतीने जलस्त्रोतांचे संवर्धन आगामी पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. गुरुवारी साटेली भेडशील ग्रामपंचायत क्षेत्रातील ओहोळावर एकूण सहा बंधारे बांधण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा मधील विद्यार्थी शिक्षक, गावातील महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी महिला ग्राम संघ, आशा सेविका, ग्रामस्थ यांनी एक दिवस श्रमदान केले.

या सगळ्यांच्या श्रमदानाने गुरुवारी एकूण सहा वनराई बंधारे बांधण्यात आले. पुढील कालावधीत आवश्यक त्या ठिकाणी आणखीही बंधारे उभारण्यात येणार आहेत त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हे बंधारे निश्चितच उपयुक्त ठरतील असा विश्वास सर्वांनीच व्यक्त केला. तसेच नळयोजनांच्या उदभव विहिरी मधील पाणीसाठा वाढण्यासाठी नदीवर मोठे बंधारे घालण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी पं. स.सदस्य संजय सातार्डेकर, सरपंच छाया धर्णे, उपसरपंच चंद्रकांत मयेकर, ग्रामपंचायत सदस्य सेजल धर्णे, संपदा गवस, शोभना जुवेकर, इस्माईल चांद, गणपत डांगी, कर्मचारी प्रवीण चौगुले, रामचंद्र धर्णे, रमेश करमळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, आरोग्य सेवक प्रमोद तळणकर, आरोग्य सेविका, सहा.कृषी अधिकारी श्री.राठोड, केंद्रशाळा साटेली भेडशी मुख्याध्यापिका पूनम पालव व सहकारी शिक्षक विद्यार्थी, करुणा सदन विद्यार्थी शिक्षक, ग्रामपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, महिला बचतगट, महिला ग्रामसंघ प्रतिनिधी, पर्यवेक्षक, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.