LIVE UPDATES

Sawantwadi Crime : काम सोडून दुसरीकडे जाणार होता म्हणून २३ वर्षीय तरुणाची हत्या

गोव्यात मारहाण करून सावंतवाडीतील निरवडे येथे मृतदेह फेकला
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 08, 2026 17:06 PM
views 41  views

सावंतवाडी : शोरमा सेंटरमधील काम सोडून दुसरीकडे कामाला जाणार असल्याच्या रागातून एका २३ वर्षीय तरुणाची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने गोवा येथून या तरुणाचा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील निरवडे - नमसवाडी येथे टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत अजीम जुल्फीकार खान (वय २३, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. ओल्ड गोवा) हा संशयित आरोपी दीपराज संजय गोवेकर (रा. दिवार, नॉर्थ गोवा) याच्याकडे काम करत होता. मात्र, अजीम हे काम सोडून दुसरीकडे कामाला जाणार होता. याच रागातून ६ ऑक्टोबर रोजी दुपारीच्या सुमारास ओल्ड गोवा येथील रुमवर येऊन संशयित आरोपी दीपराज गोवेकर व त्याच्या साहिल नावाच्या मित्राने अजीमला लाकडी दांडक्याने, हाताने व लाथांनी जबर मारहाण केली.

मारहाणीत अजीम गंभीर जखमी होऊन चालण्याच्या स्थितीत नसतानाही आरोपींनी त्याला जबरदस्तीने कपड्याची बॅग भरावयास लावली. त्याला निळ्या रंगाच्या अल्टो कारमध्ये बसवले.

दरम्यान, गाडीतच अजीमचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी घटनेची कोणतीही माहिती पोलिसांना न देता किंवा वैद्यकीय मदत न घेता मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अजीमचा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील निरवडे - नमसवाडी येथील एका फेकून दिला आणि तेथून पसार झाले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग श्रीम. नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासासाठी फॉरेन्सिक व्हॅनलाही पाचारण करण्यात आले आहे.

आरोपींचा शोध सुरू असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दीपराज गोवेकर व त्याचा मित्र साहिल यांना अटक करण्यासाठी सावंतवाडी पोलिसांची पथके रवाना झालीत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हिंगे करत आहेत.