
कणकवली : तालुक्यातील ओटव गावातील ओटववाडी येथील सुवर्णा नारायण रावले (वय ६६) या महिलेच्या गळ्यातील दोन सोन्याच्या चैन दोघांनी भर दिवसा घरात घुसून लंपास केल्या. या प्रकरणी साईल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (वय २३, रा.विरार) आणि त्याच्या मित्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुवर्णा नारायण रावले (वय ६६) यांनी या चोरीची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यात म्हटले आहे की, त्या मुंबई आणि ओटव येथील आपल्या मूळ घरी जा ये करून असतात. २० एप्रिल रोजी त्या आपल्या छोट्या नातवासह ओटव येथे आपल्या होत्या. २२ एप्रिल रोजी दुपारी साडे अकराच्या सुमारास आपल्या घरातील किचन रूममध्ये तांदुळ धुत असताना मागून कोणीतरी येऊन एका व्यक्तीने तोंड व डोळे हाताने बंद केले. दुसऱ्याने मला माझे उजव्या हाताला पकडून खेचत बेडरूम मध्ये नेले. तेथे बेडवर पाडून माझे तोंड व डोळे हाताने बंद केले. त्यावेळी मी हाताने झटापट करत होते तसेच आरडाओरड करत होते. माझा आवाज ऐकून माझा नातू बेडरूममध्ये धावत आला. तो पण त्यांना ,माझ्या आजीला सोडा, असे सांगत मोठ्याने ओरडत होता. त्यावेळी एकाने माझ्या गळ्यात हात घालून दोन दोन्याच्या चैन खेचून दोघे पळून गेले. जाताना बेडरूमच्या दरवाजाला कडी लावली आणि मागच्या दरवाजातून पळून गेले. त्यावेळी सुवर्णा यांनी बेडरूमच्या खिडकीतून पाहिले असता त्यांना सिद्धेश दिसला. सिद्धेश हा सुवर्णा यांच्या दोन नंबर मुलीचा मुलगा आहे.
या चोरीच्या घटनेत दोन तोळे वजनाची आणि एक लाख रूपये किंमतीची एक चेन तर साडे नऊ ग्रॅम वजनाची ४५ हजार रूपये किंमतीची दुसरी चेन असे मिळून १ लाख ४५ हजार रूपयांचे दागिने घेऊन दोघे पसार झाले. या प्रकरणात साईल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (वय २३, रा.विरार पूर्व) आणि त्याचा मित्र यांचा सहभाग आहे. या दोघांनी लबाडीच्या इराद्याने आणि स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी आपल्याशी झटापट करून दोन सोन्याच्या चैन चोरून नेल्याची फिर्याद दिली. त्यानुसार साईल उर्फ सिद्देश रसाळ आणि त्याचा मित्र या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.














