
सावंतवाडीतील फिरोज बाबा, कुडाळच्या हरिश्चंद्र घाडी, काजी बाबा विरोधातही गुन्हा
सिंधुदुर्ग : लग्नापूर्वी स्वतःचा बंगला असल्याचे खोटे सांगून फसवणूक करणे, नपुंसकत्व लपवण्यासाठी विवाहितेवर भोंदू बाबांच्या माध्यमातून अघोरी जादूटोणा करणे आणि शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केल्याप्रकरणी माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलासह ३ जणांवर आणि ३ भोंदू बाबांवर मुंबई विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची पत्नी गिरीजा गितेश नितेश राऊत हिने दिलेल्या सविस्तर जबाबावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून या हाय-प्रोफाइल प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तक्रारीतील माहितीनुसार, या युवतीचा विवाह ३ डिसेंबर २०१७ रोजी वांद्रे (पूर्व), मुंबई येथे माजी खासदार विनायक राऊत यांचे चिरंजीव नगरसेवक गितेश राऊत यांच्याशी झाला होता. विवाह जुळवताना वाकोला, मुंबई येथे स्वतःचा बंगला असल्याचे व रुनवाल सिंफनी येथे आलिशान फ्लॅट असल्याचे सांगितले होते. मात्र, लग्नानंतर वरात थेट वाकोला येथील झोपडपट्टीतील निवासस्थानी गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. याबाबतचा जाब विचारला असता, गितेश राऊत याने अत्यंत उर्मटपणे वागणूक देऊन धमकावल्याचा आरोप केला आहे. लग्नानंतर पती हा शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होता. ऊटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांत फिरण्यास गेले असता, तिथेही पतीने जवळीक साधण्यास नकार दिला आणि विचारणा केली असता अमानुष मारहाण केल्याचा जबाब नोंदवला आहे. पतीचे हे नपुंसकत्व लपवण्यासाठी सासरच्या मंडळींनी संगनमत करून विवाहितेवर 'बाहेरची बाधा' असल्याचे भासवायला सुरुवात केली. यासाठी सासरच्यांच्या सांगण्यावरून मुंबईतील कुर्ला येथील एक मुस्लिम बाबा, भांडुपचे आबा राऊत, कोलगाव सावंतवाडी येथील फिरोज बाबा, करूड घाट राजापूर येथील काझी बाबा आणि नानेली कुडाळ येथील हरिश्चंद्र घाडी आदी भोंदू बाबांकडे विवाहितेला नेण्यात आले. तेथे तिच्यावर लिंबू कापणे, काळ्या कणकेच्या बाहुल्या, टाचण्या, अंगारे-धुपारे, जिवंत कोंबडा, केस उपटणे आणि गोमूत्र पिण्यास सक्ती करणे यांसारखे अघोरी व अमानुष प्रकार सप्टेंबर २०१८ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत सातत्याने करण्यात आल्याची तक्रार केली आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यांना व उपचारांना पतीने प्रतिसाद दिला नाही. उलट, माजी खासदारांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून डॉक्टरांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पतीने नैसर्गिक गर्भधारणेचे पर्याय नाकारून विवाहितेवर घरच्या घरी "होम इन्सेमिनेशन" करण्याची प्रक्रिया करण्यासाठी दबाव आणला व मानसिक छळ केला. तसेच, राजकीय कार्यक्रमांमध्ये अडचण येऊ नये म्हणून मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेण्यास जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या जबाबानुसार पोलिसांनी तिचा पती गितेश विनायक राऊत, सासरे विनायक राऊत, सासू शामल विनायक राऊत, लग्न जुळवणारे सुरेखा राजेश सरफरे व राजेश सरफरे, चुलत सासरे आबा राऊत, फिरोज बाबा (रा. कोलगाव, सावंतवाडी), काझी बाबा (रा. करूड घाट, राजापूर), हरिश्चंद्र घाडी (रा. नानेली, कुडाळ) यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून एका राजकीय कुटुंबाशी संबंधित हा प्रकार समोर आल्याने संपूर्ण कोकणात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.














