
सावंतवाडी : सावंतवाडी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वनविभाग कार्यालयाच्या परिसरात असलेल्या तब्बल १०हून अधिक झाडांची कत्तल केली. त्यात परिसरात असलेल्या वनविभागाच्या गार्डन मधील झाडांचाही समावेश आहे. या प्रकाराबाबत निसर्ग प्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून वन अधिकारीच अशा प्रकारे राजरोसपणे झाडांची कत्तल करीत असतील तर न्याय कुणाकडे मागायचा ? असा सवाल उपस्थित केला आहे.
याबाबत उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी विचारले असता त्यांनी आपण परिसराचा विकास करण्यासाठी ही झाडे तोडली आहेत. आपल्याला झाडे तोडण्याचे अधिकार आहेत. त्या अधिकारात आपण आवश्यक परवानग्या घेवून झाडे तोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. सावंतवाडी येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या परिसरात गेली अनेक वर्षे उभ्या असलेल्या तब्बल दहा हून अधिक झाडांची कत्तल केल्याचे चित्र दिसत आहे. त्यात अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बाजूच्या झाडांसह परिसरात असलेल्या उद्यानातील झाडांचा समावेश आहे.













