LIVE UPDATES

बनावट कुलमुखत्यारपत्र करून जमीन विक्रीप्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 02, 2026 19:29 PM
views 1056  views

कणकवली : मयत व्यक्तीच्या नावाने खोटे व बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून त्याच्या आधारे जमीन मिळकतीचे खरेदीखत करून ते नोंदणीकृत केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात सहापैकी तीन आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कणकवली यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

आचिर्णे येथील सालवा डोंगर परिसरातील गट क्रमांक २५६/३ या जमिनीच्या व्यवहारासंदर्भात आरोप करण्यात आले होते. सदर जमिनीचे मालक गणपत भाऊ जाधव व कृष्णा येसू जाधव असल्याचे तपास कागदपत्रात नमूद करण्यात आले होते. त्यापैकी कृष्णा येसू जाधव यांचे निधन झालेले असतानाही त्यांच्या नावाने बनावट व्यक्ती उभी करून जमीन व्यवहार करण्यात आल्याचा आरोप होता.

मयत कृष्णा येसू जाधव यांच्या नावाने बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून त्याच्या आधारे जमीन मिळकतीचे खरेदीखत करण्यात आल्याचे तपासात नमूद करण्यात आले होते. तसेच या व्यवहारात खोटे व बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी माणिक गणपत राऊत यांच्यासह सहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कणकवली यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, न्यायालयात याची अंतिम सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. यावेळी यातील आरोपी क्रमांक १,५,६ आरोपींची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली.यातील आरोपी क्रमांक ५ यांच्या वतीने ॲड. अजितसिंह विठ्ठलराव काळे यांनी काम पाहिले.