
मालवण : मालवण शहरातील नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ‘प्रोसेसिंग फी’ व इतर प्रशासकीय खर्चाच्या नावाखाली लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी शुभम कृष्णकांत देशमुख (रा. कळंबा, कोल्हापूर) याचा जामीन अर्ज मालवण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री. फकीर यांनी नामंजूर करून फेटाळला.
फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीत मालवण शहरातील कर्जाची गरज असलेल्या अनेक नागरिकांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ‘प्रोसेसिंग फी’च्या नावाखाली लाखो रुपये घेतल्याचा आरोप आहे. यामध्ये भारती घाडगेकर, सागर आढाव यांच्यासह अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
संशयित आरोपीने नागरिकांना सिबिल स्कोअर न तपासता कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. कर्जाच्या ‘प्रोसेसिंग फी’च्या नावाखाली मालवण शहरातील नागरिकांकडून सुमारे ५१ लाख ६१ हजार रुपये जमा करण्यात आल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात कर्ज न देता नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी धुरीवाडा, मालवण येथील रहिवासी भारती घाडगेकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४), ३(५) अंतर्गत शुभम कृष्णकांत देशमुख आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात शुभम देशमुख याच्यासह महमूद शेख, प्रियांका खबडे, राहुल खाबडे, उमेश कांबळे, सुरेखा पाटील, आनंद माने, सचिन साबळे, सुरेश पाटील, महेश शिंदे आणि रेणुका वडर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणातील आरोपी क्रमांक एक शुभम देशमुख याला सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातही नागरिकांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठी आंतरजिल्हा टोळी सक्रिय असण्याची शक्यता तपासली जात आहे.
दरम्यान, मालवण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. फिर्यादींच्या वतीने ॲड. कौस्तुभ मराठे, ॲड. प्राजक्ता शिंदे आणि ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांनी यशस्वी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपी शुभम देशमुख याचा जामीन अर्ज नामंजूर करून फेटाळला.














