
सावंतवाडी : पेडणे वन खात्याच्या विशेष पथकाने वारखंड ग्रामपंचायतीजवळ खैरीच्या लाकडाचे तब्बल 52 ओंडके जप्त केले. या कारवाईत सावंतवाडी तालुक्यातील एकाला ताब्यात घेण्यात आले असून लाकडाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारूती ओम्नी कार वनविभागाने जप्त केली आहे. (Khair wood smuggling case)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी वन खात्याच्या विशेष पथकाला खैरीच्या लाकडाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन खात्याच्या पेडणे विभागाच्या पथकाने सापळा रचला.
सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मारुती ओम्नी कार वारखंड ग्रामपंचायतीजवळ आली असता तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी कारची तपासणी केली असता खैरीच्या लाकडाचे तब्बल ५२ ओंडके आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या ५२ खैरीच्या लाकडाच्या ओंडक्यांची वन विभागाच्या तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे.
तसेच खैरीच्या लाकडाची अवैध तस्करी केल्याप्रकरणी या प्रकरणात सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील संशयीत सोनू शेलके याचे नाव समोर आले आहे. त्याच्याविरोधात वन कायद्याअंतर्गत कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.
वन विभागाच्या पथकात आरएफओ हरीश महाले, आरएफ सुनील नाईक आणि फॉरेस्ट गार्ड स्नेहल साळगावकर यांचा समावेश होता. वन विभागाच्या या कारवाईमुळे परिसरात लाकडाची बेकायदेशीर तोड आणि अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.














