
सावंतवाडी : तालुक्यातील एका वसतिगृहातून काल रात्री उशिरा दरवाजा तोडून तीन अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत रात्रभर कसून शोधमोहीम राबवून आज सकाळी या तीनही मुलींना सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले आहे. यामुळे प्रशासनाने आणि पालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा वसतिगृहाच्या अभिरक्षकांच्या ताब्यात असलेल्या तीन अल्पवयीन मुलींनी दरवाजा तोडून वसतिगृहातून पळ काढला. मुली बेपत्ता झाल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात येताच वसतिगृह प्रशासनाची एकच धावपळ उडाली आणि त्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. पोलीस ठाण्याचा संपूर्ण फौजफाटा रात्रीच शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी रवाना करण्यात आला. मुली नेमक्या कुठे गेल्या असाव्यात, याचा सुगावा लावण्यासाठी पोलिसांनी एसटी बस स्थानके, रेल्वे स्टेशन, मुख्य चौक आणि शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर कसून तपासणी सुरू केली. संशयित ठिकाणांची आणि वाहनांची रात्रभर झाडाझडती घेतली जात होती. रात्रभर सुरू असलेल्या या शोधमोहिमेला आज सकाळी यश आले.
पोलिसांना मिळालेल्या एका गोपनीय माहितीच्या आधारे, सकाळी १० वाजताच्या सुमारास या तीनही अल्पवयीन मुलींचा शोध लागला. पोलिसांनी त्यांना सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले असून, पुढील आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया आणि समुपदेशनासाठी त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्या मुलींनी नेमके कोणत्या कारणासाठी हे पाऊल उचलले, याचा तपास पोलीस करत आहेत.














