LIVE UPDATES

Rajapur News : पोलीस पाटलांच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला

६७ हजारांचा मुद्देमाल लंपास : खरवते वाणीवाडीतील घटना, श्वानपथक व ठसे तज्ज्ञांकडून तपासणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 21, 2026 16:44 PM
views 46  views

राजापूर : ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत महामार्गालगत खरवते-वाणीवाडी येथील खरवते गावच्या पोलीस पाटील सानिका संतोष गोरे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे ६७ हजार ४६८ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ते शनिवार १९ सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. पोलीस पाटलांच्याच घरावर चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, राजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सानिका संतोष गोरे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गोरे या शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता आपल्या घराला व गेटला कुलूप लावून पती व मुलीसह गौरी-गणपती दर्शनासाठी माहेरी तळवडे येथे गेल्या होत्या. शनिवारी सकाळी त्या घरी परतल्या असता घराचे गेट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच घराचे कुलूपही तोडलेल्या अवस्थेत आढळून आले.

चोरट्यांनी कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर स्टडी रूम तसेच बेडरूममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १४ हजार ५९५ रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे प्रेस इयरिंग जोड, ३ हजार ९८७ रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची व हिऱ्याची कुडी, २ हजार ९०० रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे व हिऱ्याचे प्रेस इयरिंग, २ हजार १०० रुपये किमतीची अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ हजार २२० रुपये किमतीच्या एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या मुद्द्या, ५ हजार ४१ रुपये किमतीचे आठ तोळे वजनाचे चांदीचे पैंजण आणि ३० हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ६७ हजार ४६८ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५ (अ), ३३१ (३) व ३३१ (४) प्रमाणे करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. चोरीचा तपास करण्यासाठी तातडीने श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील ठसे व इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख करीत आहेत.