LIVE UPDATES

Crime News : गोवा बनावटीची 17 लाखांची दारु जप्त

उत्पादन शुल्क विभागाची पहाटे कारवाई : विविध कलमांनुसार गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 11, 2026 18:32 PM
views 21  views

धारवाड : गोव्यातून कर्नाटकातील धारवाड येथे बेकायदा पद्धतीने नेण्यात येत असलेला सुमारे १७ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. गोवा बनावटीची दारू परराज्यात नेण्याच्या प्रयत्नाविरोधात उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून, यामुळे अवैध मद्य वाहतुकीचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला गोव्यातून कर्नाटकच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दारूची बेकायदा वाहतूक केली जात असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवत संबंधित वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला. त्याची बाजारातील किंमत सुमारे १७ लाख रुपये असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.

उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत धारवाड येथील संशयित रेवणसा परशुराम कठारे याला अटक करण्यात आली असून दारु वाहतूकीसाठी वापरण्यात आलेली कार, दुचाकी व मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई धारवाड जिल्ह्याचे अबकारी उपआयुक्त आणि हुबळी विभागाचे अबकारी उपअधीक्षक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली. अबकारी अधिकारी विश्वनाथ एस. माविनकट्टी, अबकारी उपनिरीक्षक नागनगौडा पाटील, मच्छेंद्र रोडकर, अशोक सफारे आणि शिवानंद सुणगार यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

जप्त करण्यात आलेला मद्यसाठा धारवाड येथे कोणाकडे पोहोचविण्यात येणार होता, या वाहतुकीमागे नेमका कोणाचा हात आहे आणि यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

प्रकरणातील संबंधित व्यक्तींविरोधात उत्पादन शुल्क कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, गोव्यातून परराज्यात होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई अधिक तीव्र केली आहे. मोठ्या किमतीचा मद्यसाठा जप्त झाल्याने या प्रकरणाचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.