
राजापूर : लांजा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड येथे शनिवारी सकाळी ऑरा कारला एका भरधाव स्कॉर्पिओने धडक दिल्याने ऑरा कारने पेटून जळून पूर्णपणे खाक झाली होती. याप्रकरणी स्कॉर्पिओ चालकावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार, सिकंदरकुमार किशोर साव (वय २३, रा.विरार पूर्व, जि.पालघर) हा आपल्या ताब्यातील हुंडाई कंपनीची ऑरा कार क्रमांक (एमएच.४८.डीक्यू. ३५५७) घेऊन शुक्रवारी रात्री विक्रोळी येथून कणकवलीकडे भाडे घेऊन निघाला होता. या प्रवासा दरम्यान शनिवारी पहाटेच्या वेळेस ऑरा कार मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड येथे संरक्षक भिंतीजवळ उभी करण्यात आली होती.
अशातच सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओने (एमएच.४७.बीटी.८००६) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑरा कारला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर काही वेळातच ऑरा कारने अचानक पेट घेतला आणि काही वेळातच कार आगीत पूर्णपणे जळून खाक झाली.
या प्रकरणी स्कॉर्पिओ चालक नीरज मायाशंकर यादव (वय २५, मुळ रा.ग्रामनगरी, पो.राजेपुर, जि.जौनपूर, राज्य.उत्तरप्रदेश सध्या रा.मालाड पूर्व, मुंबई) याने स्वतःच्या जीविताला धोका उत्पन्न होईल अशा भरधाव वेगाने, हयगयीने व बेदरकारपणे गाडी चालविल्याने त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर करत आहेत.












