
लांजा : राजापूर :लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्थानकावरील प्रलंबित मागण्यांसाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीणच्या वतीने प्रवाशांचे सुरू झालेले लाक्षणिक उपोषणाचा लढा रेल्वे प्रशासनाने काही मागण्यांवर कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र पुढील कार्यवाही न झाल्यास २० ऑक्टोबरला बेलापूर येथे उपोषण होणार आणि मागण्या पूर्ण न झाल्यास २३ नोव्हेंबरला विलवडे येथे 'रेल रोको' चा इशारा देण्यात आला आहे.
विलवडे स्थानकावर जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, मांडवी आणि कोचीवेली एक्सप्रेसला थांबा मिळावा, स्थानकावर दुसऱ्या फलाटाची निर्मिती करून दोन्ही फलाटांना जोडणारा पादचारी पूल उभारावा तसेच कोकणकन्या, दिवा पॅसेंजर आणि तुतारी एक्सप्रेससाठी आरक्षण कोटा उपलब्ध करून द्यावा अशा प्रमुख मागण्या प्रवासी संघटनेने केल्या आहेत.
याशिवाय दिव्यांग प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी, कोकण रेल्वेचे जनक प्रा.मधु दंडवते यांचे तैलचित्र स्थानकावर लावण्यास परवानगी द्यावी, स्थानक परिसरातील शौचालयाची टाकी बंद करावी, स्थानक रस्त्यावरील पथदिवे सुरू करावेत, तसेच प्रतीक्षागृह व रॅम्पजवळील सुविधांबाबत आवश्यक कार्यवाही करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांसंदर्भात रविवारी २० सप्टेंबर रोजी झालेल्या उपोषणाला मुंबईतील चाकरमानी तसेच लांजा तालुक्यातील ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. शेकडो प्रवासी व ग्रामस्थ विलवडे स्थानकावर उपस्थित होते. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या उपोषणात सुरुवातीला व्यासपीठावर मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर दुपारी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, तहसीलदार आणि उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.
या चर्चेदरम्यान रेल्वे प्रशासनाने स्थानकातील विजेच्या व इतर काही मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तर स्थानकावरील दुसऱ्या फलाटाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या २०२६-२७ च्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, मांडवी आणि कोचीवेली एक्सप्रेसला विलवडे स्थानकावर थांबा देण्याबाबत रत्नागिरी रेल्वे प्रशासनाने बेलापूर कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविल्याचे पत्रही उपोषणकर्त्यांना देण्यात आले.
या आश्वासनांनंतर प्रवासी संघटनेने लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र, २० ऑक्टोबरपर्यंत मागण्यांबाबत ठोस हालचाल झाली नाही, तर २० ऑक्टोबर रोजी बेलापूर रेल्वे स्थानकावर पुन्हा उपोषण करण्यात येईल. त्यानंतरही रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही न झाल्यास २३ नोव्हेंबर रोजी विलवडे रेल्वे स्थानकावर ‘रेल रोको’ आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे.
दरम्यान, यावेळी रत्नागिरीचे रेल्वे अधिकारी सीनियर डीसीएम शैलेश अंबर्डेकर, एओएम देवेंद्र अहिरे, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे पोलीस अधिकारी, विविध शासकीय कर्मचारी तर विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबईचे सल्लागार सुभाष लाड व ग्रामीणचे अध्यक्ष अमोल रेडीज, उपाध्यक्ष विभागून सुरेश शिगम, भास्कर खामकर, संतोष चव्हाण तर सरचिटणीस दीपक तोरस्कर, सहचिटणीस राजेश बेर्डे, खजिनदार अन्वर रखांगी आदींसह पदाधिकारी आणि ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










