LIVE UPDATES

एसटीमध्ये चढताना वृद्धेची सोन्याची माळ लंपास

वैभववाडी बसस्थानकातील घटना; गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने केली चोरी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 19:50 PM
views 23  views

वैभववाडी : आठवडी बाजारासाठी शहरात आलेल्या ७२ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची माळ एसटी बसमध्ये चढताना अज्ञात महिलेने लंपास केली. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास वैभववाडी बसस्थानकात घडली. बाजाराचा दिवस असल्याने बसस्थानकात मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्या महिलेने हात साफ केला. याप्रकरणी जयवंती तुकाराम पाटील (वय ७२, रा. शिराळे गावठण) यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सौ. पाटील आज आठवडी बाजारासाठी शहरात आल्या होत्या. खरेदी आटोपल्यानंतर त्या दुपारी एकच्या एसटी बसने घरी जाण्यासाठी बसस्थानकात आल्या. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत पाठीमागून आलेल्या एका महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ ओढून लंपास केली.

गळ्यातील माळ चोरीला गेल्याचे लक्षात येताच पाटील यांनी तत्काळ एसटी वाहकाला याबाबत माहिती दिली. वाहकाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत संशयित महिलेने तेथून पोबारा केला होता.

यानंतर पोलिसांनी चोरी करणाऱ्या महिलेच्या वर्णनावरून शहरात शोध घेतला. मात्र संशयित महिला सापडून आली नाही. दरम्यान, सायंकाळी एका महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव करीत आहेत.