
कुडाळ : येथील मुख्य गणेश घाटावर सात दिवसांच्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि भावुक वातावरणात पार पडला. या सोहळ्यास कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी उपस्थित राहून विसर्जन व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या श्रद्धा आणि भावनांचा सन्मान राखत प्रशासनाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे हा सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे संपन्न झाला.
'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषाने आणि आरतीच्या गजराने मुख्य गणेश घाट परिसर दुमदुमून गेला होता. विसर्जनादरम्यान गणेशभक्तांची कोणतीही अडचण होऊ नये यासाठी नगरपंचायत व पोलीस प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले होते.
यावेळी कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी, वन विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासनातील कर्मचारी, विविध संबंधित विभागांचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने गणेशभक्त नागरिक उपस्थित होते. सर्व नागरिक आणि विविध शासकीय यंत्रणांच्या संयुक्त सहकार्यामुळे विसर्जन सोहळा पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडला.












