LIVE UPDATES

Sindhudurg News : दोडामार्गमध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई

कुडासे तिठ्यावर दोन डंपर जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 08, 2026 19:10 PM
views 101  views

दोडामार्ग : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना दगड वाहतूक करणारे दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेली दोन्ही वाहने पुढील आदेशापर्यंत दोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. ही कारवाई ७ सप्टेंबर रोजी कुडासे तिठा येथे करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी, भेडशी तसेच भेडशी मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने कुडासे तिठा येथे वाहनांच्या तपासणीची मोहीम राबविली. यावेळी प्रकाश नागुरमेटी यांच्या ताब्यातील (GA 05 T 7661) क्रमांकाच्या डंपरची तपासणी करण्यात आली. या वाहनाच्या चालकाकडे असलेला टीपी पास ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदणीकृत नसल्याचे तपासणीत आढळून आले.

तसेच उमेश चव्हाण यांच्या ताब्यातील (GA 05 T 8105) क्रमांकाच्या डंपरची तपासणी केली असता, चालकाकडे असलेला टीपी पास ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदणीकृत नसल्याचे आढळले. दोन्ही वाहनांमधून विनापरवाना दगडाची वाहतूक होत असल्याचा अहवाल मंडळ अधिकारी, भेडशी यांनी महसूल प्रशासनाकडे सादर केला. त्यानंतर सदर वाहतूक अनधिकृत असल्याने दोन्ही डंपर जप्त करण्यात आले.

पुढील आदेश होईपर्यंत दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात ही जप्त वाहने देण्यात आली असून वाहनांच्या चाव्या पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. या दोन्ही वाहनांवर अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीप्रकरणी तहसील प्रशासनामार्फत पुढील दंडात्मक कारवाई सुरू असल्याची माहिती तहसीलदार राहुल गुरव यांनी दिली.