LIVE UPDATES

India vs Indonesia Asian Games Hockey : हॉकीत भारताचा इंडोनेशियावर १३-१ असा दणदणीत विजय

भारताचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध
Edited by: Rajat Sawant
Published on: September 21, 2026 13:19 PM
views 25  views
Asian Games Hockey India Thrash Indonesia 13-1 in Opening Match

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष हॉकीच्या 'पूल ए' मधील सलामीच्या सामन्यात गतविजेत्या भारताने इंडोनेशियाचा १३-१ असा धुव्वा उडवला. या सामन्यात स्ट्रायकर दिलप्रीत सिंगने चार गोल केले. दिलप्रीतने (१८ व्या, १९ व्या, ३७ व्या आणि ४९ व्या मिनिटाला) चार 'फील्ड गोल' केले, तर शिलानंद लाक्रा (६ व्या आणि ३५ व्या मिनिटाला) आणि सुखजीत सिंग (३८ व्या आणि ४८ व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदवले.

दरम्यान, भारत आपला पुढील सामना मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी केशरी रंगाची जर्सी परिधान केली होती. गोल करणाऱ्या इतर भारतीय खेळाडूंमध्ये अभिषेक (१२ व्या मिनिटाला), राजिंदर सिंग (१९ व्या मिनिटाला), मनदीप सिंग (२१ व्या मिनिटाला), कर्णधार हरमनप्रीत सिंग (२८ व्या मिनिटाला) आणि जुगराज सिंग (४७ व्या मिनिटाला) यांचा समावेश होता.

इंडोनेशियासाठी ३३ व्या मिनिटाला औलिया अल अर्द याने एकमेव गोल केला. सहाव्या मिनिटाला, इंडोनेशियाचा गोलकीपर आलम फजर याने कर्णधार हरमनप्रीतचा 'ड्रॅग-फ्लिक' अडवला, परंतु 'रिबाउंड'वर लाक्राने गोल केला.

भारताने चेंडूवर नियंत्रण राखले आणि बहुतांश वेळ सामन्यावर वर्चस्व गाजवले. १२ व्या मिनिटाला अभिषेकने आघाडी दुप्पट केली; त्याने मारलेला पहिला फटका इंडोनेशियाच्या गोलकीपरने अडवल्यानंतर मिळालेल्या 'रिबाउंड'वर त्याने गोल नोंदवला.

१८ व्या मिनिटाला अभिषेकच्या पासवर दिलप्रीतने गोल केला आणि धावसंख्या ३-० अशी केली. एका मिनिटानंतर, सुखजीत सिंगने 'फार पोस्ट'च्या दिशेने दिलेल्या पासचे रूपांतर दिलप्रीतने गोलमध्ये केले. काही सेकंदांनंतर, सुखजीतच्या मदतीने राजिंदरने गोल करत आपले नाव गुणफलकावर नोंदवले. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांनी मनदीपने आणखी एक 'फील्ड गोल' केला. भारताने इंडोनेशियाच्या बचावफळीवर दबाव कायम ठेवला आणि २७ व्या मिनिटाला पेनल्टी मिळवली. हरमनप्रीतने पुढच्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले आणि मध्यंतरापर्यंत भारताला ७-० अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला इंडोनेशियाच्या अल अर्दने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. तरीही भारताचे वर्चस्व कायम राहिले आणि राजिंदरच्या अचूक पासवर शिलाानंदने आपला दुसरा गोल केला. दिलप्रीतने चेंडू जाळीत ढकलून आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली.

काही सेकंदांनंतर सुखजीतनेही 'फील्ड गोल' केला. त्यानंतर, ४७ व्या मिनिटाला जुगराजने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि अवघ्या एका मिनिटानंतर सुखजीतने आपला दुसरा 'फील्ड गोल' नोंदवला. एका मिनिटानंतर दिलप्रीतने आपला चौथा गोल केला आणि भारताचा मोठा विजय निश्चित केला.