LIVE UPDATES

Ratnagiri News : शेतकऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

मंडळ कृषी अधिकारी अनिल मोरे यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 21, 2026 16:15 PM
views 19  views

रत्नागिरी : कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी अनिल मोरे यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने श्री कोर्लेचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात  'लोकसंवाद 2026' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मनिष साळुंखे, उपाध्यक्ष महेश साळुंखे, चेतन झोरे, संजय झोरे, दिपक चव्हाण, सखाराम साळुंखे आदी उपस्थित होते.

जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकसंवाद २०२६ या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. मार्गदर्शन करताना श्री. मोरे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर ७/१२ उतारा आहे, ते १० गुंठ्यांपासून ते २ हेक्टरपर्यंत फळबाग लागवडीचा लाभ घेऊ शकतात.

शेतीकामासाठी मजुरांची कमतरता भासत असल्याने यांत्रिकीकरणावर ५० टक्के ते ६० टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये गवत कापणी यंत्र, झाड कापणी यंत्र, फवारणी पंप, पॉवर टिलर, पाण्याचा पंप यांसारख्या अवजारांचा समावेश आहे.  आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी पीक विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. अवकाळी पाऊस किंवा हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बागांचा 'ॲग्रीस्टॅक' नोंदणीसह वेळेत पीक विमा उतरवावा.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सज्ञान योजना: शेतीकाम करताना किंवा अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला २ लाख रुपयांपर्यंत, तर अपंगत्व आल्यास (एक हात, एक पाय किंवा डोळा गमावल्यास) १ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. अधिक माहिती व अर्जासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी सहाय्यक अथवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.