LIVE UPDATES

ratnagiri news : रत्नागिरीत २७ रोजी पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रम

पर्यटन संस्था, समृद्ध चेंबर ऑफ कॉमर्स, पर्यटन संचालनालयातर्फे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 21, 2026 16:05 PM
views 22  views

रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित आणि समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स (मुंबई) व पर्यटन संचालनालय (डीओटी) यांच्यातर्फे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी १० ते सायंकाळी ४ वा. मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.

डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पर्यटनाची पुनर्रचना या संकल्पनेवर हा जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिलेले असल्यामुळे तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रकिनारे, श्रीक्षेत्र गणपतीपुळेसारखे जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ तसेच गड-किल्ले, सह्याद्रीचे खोरे, कोकणातील आकर्षक धबधबे तसेच जागतिक दर्जाची कातळशिल्पे अशी पर्यटकांना भुरळ घालणारी अनेक पर्यटन स्थळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. देश-विदेशातून आता मोठ्या प्रमाणावर पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात येत असतात. त्याचप्रमाणे येथे सोयी-सुविधा निर्माण होण्यासाठी, स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती व स्थानिक कलांना वाव देण्यासाठी हा जागतिक पर्यटन दिन साजरा करणार आहोत.

पर्यटन क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केलेल्या ५ महिला व ५ पुरुष यांना पर्यटन मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास व्हावा आणि स्थानिक स्तरावर व शासन स्तरावर वेगवेगळ्या सोयीसुविधांसाठी पर्यटन दिनातून मागण्या करण्यात येणार आहेत. या मागण्या जिल्हा स्तरावरून मंत्रालय स्तरावर जाऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येतो. अनेक सोयीसुविधा जिल्ह्यात आता निर्माण होत आहेत. शासनातर्फे नवीनच पर्यटन धोरण जाहीर झाले, त्यामध्ये पर्यटक व्यावसायिकांना अनेक सबसिडी देण्यात आलेल्या आहेत, त्याचे मार्गदर्शनही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

या परिषदेस आमदार रविंद्र चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भाजपा), उदय सामंत (उद्योगमंत्री तथा पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा), खासदार नारायण राणे, नितेश राणे (मत्स्य व बंदर विकास मंत्री), प्रमोद जठार (आमदार), किरण सामंत (आमदार), भास्करशेठ जाधव (आमदार), जिल्हाधिकारी मनुज जिंदल वैदेही रानडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रत्नागिरी), पर्यटन संचालनालयाच्या सौ. प्रज्ञा मनोहर, डॉ. विनय नातू (उपाध्यक्ष, सिंधुरत्न समृद्ध योजना २.०, संगमेश्वर), किशोर धारिया (हिरवळ प्रतिष्ठान), संजय यादवराव (समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स), डॉ. श्रीधर ठाकुर (संचालक, इन्फिगो), रमेश कीर (अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन), बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे, प्रशांत यादव (जिल्हाध्यक्ष, भाजपा), बाळासाहेब माने (माजी आमदार), नितिन बगाटे (जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी) व जिल्ह्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पर्यटक प्रेमी व पर्यटन व्यावसायिक तसेच टुरिस्ट गाईड, टुरिस्ट गाड्यांचे व्यावसायिक व स्थानिक नागरिक, हॉटेल व्यावसायिक, आंबा बागायतदार, होम स्टे, हाऊस बोट व्यावसायिक, कोकणातील स्थानिक कलाकार, पर्यटन सहकारी संस्थांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, सुहास ठाकुरदेसाई, नंदू तांबे, मकरंद केसरकर, कातळशिल्पतज्ञ भाई रिसबुड यांनी केली आहे.