LIVE UPDATES

cyber fraud : सायबर फसवणुक प्रकरणात आणखी एक संशयित अटकेत

संशयित युवक उत्तरप्रदेशचा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 01, 2026 20:12 PM
views 25  views

देवगड : सायबर फसवणुकीतील सुमारे साडेतीन लाख रूपये रक्कम देवगडमधील एका युवकाच्या बँक खात्यात जमा झाली हाेती. याप्रकरणी देवगड पाेलिस स्थानकात दाखल गुन्ह्याअंतर्गत एका संशयिताला देवगड पाेलिसांनी अटक केली आहे. हिमांशू विघ्नेश्वर शर्मा ((29) रा.कछुआ अयाेध्या उत्तरप्रदेश) असे संशयित आराेपीचे नाव असून त्याला देवगड न्यायालयाने शनिवारपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

देशाच्या विविध भागातील नागरिकांची ऑनलाईन फसवणुक करून संशयिताने लुट केलेली 3 लाख 40 हजार 981 रूपये 89 पैसे इतकी रक्कम देवगडमधील एका युवकाच्या बँक खात्यात जमा झाल्याचे सायबर गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात उघड झाले हाेते. हा प्रकार 3 जानेवारी 2025 ते 19 एप्रिल 2026 या कालावधीत घडला हाेता.

संबंधित युवकाने त्याचा खात्यात जमा झालेली रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी इतर खात्यांमध्ये वर्ग केल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाले हाेते. त्यामुळे याप्रकरणी संबंधित संशयित युवकाविरूध्द देवगड पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

देशातील विविध भागातील एकूण 12 तक्रारदारांनी आपली ऑनलाईन फसवणुक झालेली तक्रार नॅशनल सायबर क्राईम रिपाेर्टींग पाेर्टलवर नाेंदविली हाेती. त्यामुळे या प्रकरणाचा सखाेल तपास पाेलिसांकडून सुरू हाेता. या प्रकरणाची व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादीत नसून कर्नाटक, मध्यप्रदेशसह एकूण 12 राज्यातील सायबर फसवणुकीशी संबंधित आहे.

देवगड पाेलिसांनी दाखल गुन्ह्याअंतर्गत या प्रकरणाचा तपास करताना गुन्ह्यात वापरलेले माेबाईल सीमकार्डच्या आधारे संशयित हिमांशू विघ्नेश्वर शर्मा याला ताब्यात घेत मंगळवारी अटक केली. देवगड न्यायालयाने संशयिताला शनिवारपर्यंत चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पाेलिस निरिक्षक श्याम बुवा करीत आहेत.