
चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावरील खेर्डी एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांचा गुटखा, पानमसाला तसेच वाहतुकीसाठी वापरलेली TATA INTRA V20 चारचाकी, मोबाईल असा १० लाख १५ हजार ६०० रूपयाचा ऐवज मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर सांगलीच्या एका तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई ३० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ११.३० वाजता करण्यात आली.
पोलिसांनी अमित अशोक कदम (४१, नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी) यांच्या फिर्यादीवरून सेजल सुनील आवळे (२२, रा. यशवंतनगर बसस्टॉपजवळ, चावला गल्ली, मिरज, जि. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयिताकडून प्रतिबंधित गुटखा व पानमसाला चारचाकी वाहनातून बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात होती. कारवाई दरम्यान विविध प्रकारचे गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणात पॅकेट्स, तसेच TATA INTRA V20 (एमएच१२/एसएफ/२४१२) वाहन व मोबाईल असा १० लाख १५ हजार ६०० रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी सेजल हा सांगलीहून महाडला गुटखा घेऊन जात होता. खेर्डी येथे पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्यावर या पूर्वी सांगली संजय नगर पोलीस ठाणे व वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून ४ गोणीत ८८० पॅकेटस् ताब्यात घेण्यात आले. त्याला चिपळूण न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी सुनावली. पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक ओम आघाव करीत आहेत.













