
सावंतवाडी : आईने गावातील लोकांकडे आपल्याबद्दल खोटेनाटे सांगितले या गैरसमजातून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी मुलाला सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दीपक विष्णू दळवी (वय ४७, रा. विलवडे ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
विलवडे येथील आरोपी दीपक दळवी हा आपली आई हिच्यासोबत राहत होता. आपल्या आईने गावातील लोकांकडे आपल्याविरुद्ध काहीतरी खोटे सांगितले आहे, असा गैरसमज त्याने करून घेतला होता. याच रागातून त्याने तीला जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या आईचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतरही आरोपीने बांदा पोलीस ठाण्यात जाऊन, आईला धाप लागली आणि ती बेशुद्ध पडल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी तपास केल्यानंतर हत्येचे सत्य समोर आले. याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ आणि १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांच्या न्यायालयात झाली. सरकारी अभियोक्ता रुपेश विठ्ठल देसाई यांनी सरकार पक्षातर्फे प्रबळ युक्तिवाद केला. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी धरून शिक्षा सुनावली. गुन्ह्याचा सखोल तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. जी. काळे यांनी केला होता.














