LIVE UPDATES

Konkan forest fires : कोकणातील भीषण वणव्यांमुळे निसर्गसौंदर्याचा ऱ्हास

पावसाळ्यात हिरवाई, उन्हाळ्यात काळेभोर डोंगर
Edited by: सुजित धाडवे
Published on: August 29, 2026 17:18 PM
views 51  views
Forest fire burning across hills in Konkan during summer

महाड : पावसाळा सुरू झाला की कोकणातील डोंगर-दऱ्या हिरवागार शालू पांघरतात. खळाळणारे धबधबे आणि टेकड्यांवरील मखमली हिरवळ पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक कोकणात गर्दी करतात. निसर्गाचे हे समृद्ध रूप पर्यटनाला गती देते. मात्र उन्हाळा सुरू होताच हाच निसर्गरम्य प्रदेश भीषण वणव्यांच्या ज्वालांमध्ये पुरता होरपळून निघतो.

जानेवारी ते मे या कालावधीत डोंगरांना लागणाऱ्या आगींमुळे शेकडो हेक्टरवरील दुर्मीळ औषधी वनस्पती, फळझाडे आणि वन्यजीवांचा अधिवास खाक होत असून पर्यावरणाचा समतोल कमालीचा बिघडला आहे.

पावसाळ्यात रानात मिळणाऱ्या रानभाज्यांवर स्थानिकांची गुजराण होते. मात्र, उन्हाळा जवळ येताच मिळणारा आंबा, काजूचा मोहर आणि करवंदांसारखी स्थानिक रानफळे या भीषण वणव्यात पूर्णपणे जळून भस्मसात होत आहेत. यामुळे शेतकरी व बागायतदारांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. त्यातच जंगलातील नैसर्गिक अन्न व पाण्याचे स्रोत नष्ट झाल्याने वन्यप्राणी अन्नाच्या शोधात थेट मानवी वस्त्यांमध्ये शिरू लागले असून मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर वळणावर पोहोचला आहे.

या भीषण आगींमागे केवळ निसर्गाचा कोप नसून भू-माफियांचा कट असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. डोंगरांवरील दाट झाडी आणि सुके गवत जाळून जागा मोकळी करायची, जेणेकरून बेकायदेशीर अतिक्रमण सोपे व्हावे, असा बनाव रचला जात आहे.

दुसरीकडे, रोजगाराच्या शोधात तरुणांचे शहरांकडे स्थलांतर झाल्याने गावोगावी केवळ वयोवृद्ध नागरिकच शिल्लक आहेत. अशा स्थितीत अचानक आग लागल्यास ती विझवायची कशी, हा प्रश्न आहे. वनविभागाची गस्त कागदावरच राहिल्याने हा वणवा आता थेट मानवी वस्त्यांपर्यंत पोहोचून मोठ्या जीवित व वित्तहानीचा धोका निर्माण झाला आहे.

सध्या या समस्येबाबत प्रशासकीय व सामाजिक पातळीवर व्यापक जनजागृतीचा प्रचंड अभाव दिसून येत आहे. "वणवा ही केवळ झाडं किंवा गवत जळण्याची घटना नसून, संपूर्ण कोकणाच्या अस्तित्वाला लागलेली भीषण समस्या आहे," ही भावना प्रत्येकाच्या मनात बिंबवणे अत्यंत गरजेचे आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी येत्या गणेशोत्सवाच्या काळात वनविभागाने विशेष जनजागृती सभांचे आयोजन केले पाहिजे.

सणाच्या निमित्ताने शहरातून गावी येणाऱ्या स्थानिक तरुण वर्गाशी थेट संवाद साधल्यास त्यांना वणवा रोखण्याच्या मोहिमेत सक्रियपणे सहभागी करून घेणे शक्य होईल.

'वणवामुक्त गाव' संकल्पनेला प्रोत्साहनाची गरज

निसर्गसंपदा रक्षण आणि वणवा रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना: कोकणातील निसर्ग टिकवण्यासाठी डोंगरांवर सलग समपातळी चर मारून ओलावा टिकवणे, उन्हाळ्याआधी 'फायर लाईन' तयार करणे आणि आधुनिक सॅटेलाईट अलर्ट सिस्टीमचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच जमिनी लाटण्यासाठी आगी लावणाऱ्या भू-माफियांवर कठोर गुन्हे दाखल करून 'वणवामुक्त गाव' संकल्पनेला शासकीय अनुदान व प्रोत्साहन दिले, तरच कोकणातील हे डोंगर पुन्हा वर्षभर हिरवेगार राहू शकतील.

"कोकणाची ओळख असणारा हा निसर्ग केवळ प्रशासकीय कागदपत्रांवर सुरक्षित राहू शकत नाही. आपल्या पूर्वजांनी जपलेली ही समृद्ध हिरवी दौलत पुढच्या पिढीसाठी टिकवायची असेल, तर आता प्रशासनाच्या आशेवर न राहता प्रत्येक कोकणवासीयाने स्वतःहून पुढाकार घेऊन रणांगणात उतरले पाहिजे"

--जितेंद्र रेवाळे (स्थानिक नागरिक व शिक्षक)