
कुडाळ : कुडाळ शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उदात्त हेतूने नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली 'एक दिवस माझ्या कुडाळसाठी' या विशेष स्वच्छता मोहिमेचे आज २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजता अत्यंत आयोजन करण्यात आले.
राज हॉटेल जवळील अंडरपास परिसरात राबवण्यात आलेल्या या मोहिमेला स्थानिक नागरिक, तरुण वर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 'स्वच्छ कुडाळ, सुंदर कुडाळ, अभिमान आपला कुडाळ' या प्रेरणादायी घोषणेचा नारा देत उपस्थितांनी परिसरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. या मोहिमेमुळे संपूर्ण परिसरात स्वच्छतेबाबत एक नवी जाणीव निर्माण झाली असून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
या स्वच्छता मोहिमेमध्ये कुडाळ शहरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिकांनी सक्रीय सहभाग घेत मोठ्या प्रमाणावर श्रमदान केले. मोहिमेत प्रामुख्याने नगरसेवक मंदार शिरसाट, बाळा पावसकर, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर, अमित राणे, सागर भोगटे, रोहन शिरसाट, विनय पालकर, शैलेश काळप, रवी राऊळ, सामाजिक कार्यकर्त्यांसह परिसरातील तरुण आणि नागरिक उपस्थित होते.
उपक्रमाचे कौतुक
शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व नेटकी ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. नगरसेवक मंदार शिरसाट यांनी घेतलेल्या या सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रमाचे संपूर्ण कुडाळ शहरात कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या लोकसहभागातून राबवलेल्या मोहिमांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत असून, भविष्यातही अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.











