LIVE UPDATES

कणकवलीतील संगीत मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध

श्री जगन्नाथ संगीत विद्यालयातर्फे गुरुपूजन सोहळा, सर्वांगसुंदर पखवाज वादनाने रंगत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 29, 2026 16:35 PM
views 93  views

कणकवली : श्री जगश्री जगन्नाथ संगीत विद्यालयातर्फे गुरुपूजन सोहळा, सर्वांगसुंदर पखवाज वादनाने रंगतथ संगीत विद्यालय, कणकवली शाखेच्या वतीने पखवाज अलंकार गुरुवर्य महेश विठ्ठल सावंत तसेच जयश्री मसुरकर यांचा संगीत गुरुपूजन व सत्कार सोहळा उत्साहात झाला. यानिमित्ताने सर्वांगसुंदर पखवाज वादनाबरोबरच अभंग, गजर,भैरवीसह झालेल्या संगीत मैफिलीत रसिक अगदी मंत्रमुग्ध होवून गेले.

शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी कणकवलीतील पमाज सेंटर येथील प्रमोद मसुरकर आणि कुटुंबियांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी देवता पूजन व महाआरतीनंतर संगीत अभंग गायन झाले. यावेळी भजनसम्राट गोपीनाथ लाड बुवा, पखवाज विशारद मारुती मेस्त्री बुवा, विठ्ठल येंडे बुवा यांनी अभंग गायन केले. यावेळी लक्ष्मण बागवे बुवा उपस्थित होते.

उपस्थित विद्यार्थ्यांनी सर्वांगसुंदर पखवाज वादनाचे सादरीकरण केले. श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या कणकवली शाखेतील विद्यार्थ्यांनी चंद्रचौताल , कुडाळ शाखेच्या विद्यार्थ्यांनी शिखर ताल , नवोदित विद्यार्थ्यांनी मदनताल, ओरोस येथील विद्यार्थिनींनी ताल धमार अशा विविधांगी पखवाज सहवादनातून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. युवा कलाकार विराज महेश सावंत याने ढोलकी वादनाने कार्यक्रमात रंगत आणली.

गुरुपूजन सोहळ्यात जयश्री मसुरकर यांचे गुरुपूजन व सत्कार करण्यात आला. तसेच गुरुवर्य पखवाज अलंकार महेश सावंत यांचे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुपूजन करण्यात आले. यावेळी पखवाज विशारद दत्तप्रसाद खडपकर, सचिन कातवणकर यांचेही गुरुपूजन झाले. त्यानंतर नामदेव गिरकर बुवा (मसुरे) यांच्या अभंग व भैरवी गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या सोहळ्याला  शिवसेनेचे कणकवली शहर प्रमुख प्रमोद मसुरकर,सोनाली मसुरकर, पत्रकार सुधीर राणे,सामाजिक कार्यकर्ते रमेश चव्हाण ,विनोद मेस्त्री, प्रशांत मयेकर ,सुधीर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. संगीत साधकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. संगीत क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या सोनाली मसुरकर तसेच अन्य व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला.ध्वनिव्यवस्था प्रशांत मयेकर यांनी सांभाळली.