
सावंतवाडी : सावंतवाडी-बेळगाव मार्गावरील माडखोल मेटवाडी येथे बेकायदेशीररीत्या बैलांची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो सावंतवाडी पोलिसांनी पकडला आहे. याप्रकरणी चंदगड तालुक्यातील तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी तीन बैलांची सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप क्रमांक MH09-CU-3958 मधून बैलांची वाहतूक केली जात होती. माडखोल मेटवाडी परिसरात हे वाहन अडवण्यात आले असता त्यामध्ये अत्यंत निर्दयीपणे तीन बैल कोंबलेले आढळले. या जनावरांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच त्यांची वाहतूक असुरक्षितरीत्या आणि भरधाव वेगाने केली जात होती.
या प्रकरणी पोलिसांनी दस्तगीर इसाक बेपारी, अरुण पांडुरंग गावडे, गोपाळ विठ्ठल परीट (वय ४० वर्षे) यांना ताब्यात घेतले आहे. तपासणी दरम्यान या वाहतुकीबाबत कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा जनावरांचे टॅगिंग आढळून आले नाही. तसेच जनावरांची वाहतूक करण्याचा कोणताही अधिकृत परवाना चालकाकडे नसल्याचे स्पष्ट झाले. पोलीस ठाण्यात संबंधित संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पोलिसांनी गुन्हाकामी वापरलेला पिकअप टेम्पो जप्त केला असून सुटका करण्यात आलेल्या तिन्ही बैलांना सुरक्षितरीत्या गोशाळेत हलवण्यात आले आहे.













