LIVE UPDATES

कुडाळमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विद्युत जोडणीचे काम करीत असताना घडली घटना
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 05, 2026 20:10 PM
views 139  views

कुडाळ : केळबाईवाडी नजीक कॉप्लेक्समध्ये आतील विद्युत जोडणीचे काम करीत असताना विजेच्या धक्का बसून शुभम गणपत कोकरे (१९, रा. खेर्डी दत्तवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, सध्या रा. कुडाळ) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.                     

सदर कॉम्प्लेक्स बांधून पूर्ण झाले असून त्यामध्ये विद्युत जोडणीचे (लाईट फिटिंग) काम सुरू आहे. सदर काम करण्यासाठी चिपळूण येथील शुभम कोकरे व त्याच्या कुटुंबातीलच सदस्य येथे आले होते. मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास या कॉम्प्लेक्समध्ये विद्युत जोडणीचे काम करीत होते. शुभम हा ब्रेकरने काम करीत होता. पण ब्रेकरची वायर शॉर्ट होती. हे त्याच्या लक्षात आले नाही. वीजप्रवाह सुरू असताना त्याला विजेचा धक्का  बसला. यात तो  बेशुद्धावस्थेत पडला. या घटनेनंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तत्काळ दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक होती. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. त्याच्यावर तातडीने  पुढील उपचार व्हावेत म्हणून त्याला  येथील एका खासगी रुग्णालयात हलविले. परंतु, तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू असताना सायंकाळी त्याचे निधन झाले. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार सखाराम भोई करीत आहेत.