LIVE UPDATES

कुणकेश्वर समुद्रकिनारी अवैध वाळू उपसा; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

संशयितांना ताब्यात घेत महसूल प्रशासनाला जाब
Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 11, 2026 22:21 PM
views 61  views

देवगड : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर समुद्रकिनारी आरोप असलेल्या कथित अवैध वाळू उपशामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर वरचीवाडी येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत समुद्रकिनारी सुरू असलेल्या वाळू उपशाच्या प्रकाराला तीव्र विरोध दर्शविला.

यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांना जाब विचारला तसेच काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे सचिव हेमंत वातकर, अभय पेडणेकर, वरचीवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुहास नानेरकर, निखिल कुणकेश्वरकर, सुहास वातकर, दीपक घाडी, ओंकार घाडी, केतन साटम, अनिकेत साईम, किरण गोईम यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून काही जणांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुणकेश्वरचे सरपंच आणि तलाठी यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा वरचीवाडी ग्रामस्थांनी यावेळी दिला. तसेच ग्रामस्थांनी महसूल प्रशासनालाही थेट सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली.

"श्री क्षेत्र कुणकेश्वरसारख्या पर्यटनस्थळी जर कथित अवैध वाळू उपसा सुरू असेल, तर महसूल प्रशासन नेमके काय करत आहे?" असा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी अशा प्रकारांना तातडीने आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.