
Mirabai Chanu Win 3rd Gold Medal : स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये महिलांच्या ४८ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताने पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. तिने एकूण १९० किलो वजन उचलून कॉमनवेल्थ स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले.
मीराबाई चानू यांचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ रोजी इम्फाळजवळील नोंगपोक काकचिंग येथे झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात विलक्षण ताकद होती. मीराबाईने २००८ मध्ये मणिपूरमधील क्रीडा अकादमीमध्ये वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण सुरू केले. तीन वर्षांनंतर, तिने आपल्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आणि २०११ मध्ये बंगळुरू येथील राष्ट्रीय शिबिरात ती सामील झाली. २०१२ पासून ती एनआयएस पटियाला येथे प्रशिक्षण घेत आहे. टोक्यो २०२० ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरून तिने इतिहास घडवला. मीराबाई मणिपूर पोलिसांमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे.
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मधील भारताचे हे तिसरे पदक आहे. याआधी, पुरुषांच्या हेवीवेट पॅरा-पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत झंडू कुमारने कांस्यपदक आणि पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात ऋषिकंत सिंगने रौप्यपदक जिंकले होते. पहिल्या प्रयत्नासाठी चानूने ८२ किलो वजन निश्चित केले होते. महिलांच्या ४८ किलो वजनी गटातील स्नॅच फेरीत, तिने दुसऱ्या प्रयत्नात ८२ किलो आणि तिसऱ्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलून सलग दोनदा कॉमनवेल्थ स्पर्धेचा विक्रम मोडला.














