रेल्वे पुलाखाली वाळूचा माफीयांचा 'धुमाकूळ'; प्रशासन गप्प का?

बाव-तळगाव परिसरात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 28, 2026 23:01 PM
views 72  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बाव, तळगाव आणि बागवाडी या परिसराच्या हद्दीतून वाहणाऱ्या कर्ली नदी पात्रात रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर वाळू उपसा जोरात सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाळू माफियांच्या या मनमानी कारभारामुळे केवळ पर्यावरणाचा ऱ्हासच होत नाही, तर सार्वजनिक मालमत्ता आणि मानवी जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रात रात्रीच्या वेळी वाळूचे उत्खनन केले जात आहे. अती-वाळू उपशामुळे कर्ली नदीचे पात्र ठिकठिकाणी अतीखोल झाले आहे. नदीपात्राची ही अवस्था आता स्थानिक नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनली आहे.

नदीकिनारी वाळू उपसा केल्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. या धूपेमुळे नदीकाठच्या सुपीक जमिनी, माड आणि इतर झाडे उन्मळून थेट नदीपात्रात कोसळत आहेत. या अनधिकृत उत्खननामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत असून, शेती व्यवसायावरही याचे गंभीर परिणाम होत आहेत.

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, काही ठिकाणी रेल्वे पुलाच्या हद्दीतच वाळू उपसा केला जात आहे. नदीपात्रातील वाळू काढल्यामुळे पुलाच्या पायाला धोका निर्माण होऊ शकतो. रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या भागाकडे दुर्लक्ष करणे भविष्यात महागात पडू शकते. एकीकडे रेल्वे सुरक्षा महत्त्वाची असताना, दुसरीकडे अशा प्रकारे पुलाच्या अगदी जवळ वाळू उपसा कसा काय केला जातो? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशासन 'डोळेझाक' का करत आहे?

"वाळू माफियांची ही धाडसी कृत्ये रात्रीच्या अंधारात सुरू असतात, हे प्रशासनाला माहीत नाही का?" असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे की, त्यांचे 'अर्थपूर्ण' लागेबांधे आहेत? असा प्रश्नही आता चर्चेत आहे. कारवाई करण्याऐवजी प्रशासन गप्प का? अशी विचारणा करून नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे निर्माण झालेला हा धोका टाळण्यासाठी, जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाने तातडीने दखल घेऊन या वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.