
सिंधुदुर्गनगरी : कमिशनचे आमिष दाखवून नागरिकांची बँक खाती सायबर गुन्ह्यांसाठी वापरण्याचे प्रकार वाढत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकरणांत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये सिंधुदुर्गसह मुंबई, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश येथील एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य तिघांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पैशांच्या आमिषाला बळी पडून आपली बँक खाती अनोळखी व्यक्तींना वापरण्यास देऊ नयेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी (१४ ऑक्टोंबर) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी म्युल बँक अकाऊंट बाबत माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपस्थित होत्या.
काय आहे म्युल बँक खाते?
सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम एका खात्यात स्वीकारून ती अन्य खात्यांमध्ये वळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बँक खात्यांना ‘म्युल खाते’ म्हणतात. कमिशन, घरबसल्या नोकरी, गेमिंगमधील पैसे, शेअर बाजार किंवा क्रिप्टोकरन्सीतील व्यवहार आणि कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुन्हेगार नागरिकांकडून बँक खात्यांची माहिती मिळवतात.
सहा पोलीस ठाण्यांत गुन्हे
जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, मालवण, सिंधुदुर्गनगरी आणि देवगड या सहा पोलीस ठाण्यांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणांत आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, तिघांना गुन्ह्यातील सहभागाबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत.
खातेदारांवरही कारवाईचा धोका
स्वतःचे बँक खाते दुसऱ्याला वापरण्यास दिल्यास त्यात जमा होणारी रक्कम सायबर फसवणुकीची असल्याचे निष्पन्न होऊ शकते. अशा वेळी संबंधित खातेधारकाला पोलिसांच्या तपासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मित्र, नातेवाईक किंवा अनोळखी व्यक्तींसाठीही खात्यात पैसे स्वीकारून ते पुढे पाठवू नयेत.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक व चेकबुक दुसऱ्याला देऊ नका.
- ओटीपी, पिन, सीव्हीव्ही आणि इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड गोपनीय ठेवा.
- कमिशनच्या बदल्यात पैसे स्वीकारून अन्य खात्यात पाठवू नका.
- संशयास्पद व्यवहार आढळल्यास बँक आणि पोलिसांना त्वरित कळवा.
फसवणूक झाल्यास येथे संपर्क साधा
सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची व कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता जपावी, असे आवाहन सिंधुदुर्ग पोलिसांनी केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










