LIVE UPDATES

Rajapur POCSO case : अल्पवयीन युवतीवरील अत्याचार प्रकरणी लॉजमालकाविरोधातही गुन्हा

व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी चौघांवर कारवाई; राजापूर पोलिसांकडून सखोल तपास
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 14, 2026 12:35 PM
views 40  views

राजापूर : सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून एका अल्पवयीन युवतीला राजापूर शहरानजीकच्या कोदवली-साईनगर पुनर्वसन वसाहतीतील मँगो लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या तसेच तिचे व्हिडिओ तयार करून ते प्रसारित करत बदनामी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. या प्रकरणी संबंधित अल्पवयीन युवकाविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी अन्य चौघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता मँगो लॉजचा मालक संशयित महंमद मुबारक ठाकूर (रा. मधीलवाडा, राजापूर) याच्याविरोधातही पोलिसांनी कलम १७ अन्वेय गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान कोदवली-साईनगर येथील मँगो लॉजवर हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर ७ सप्टेंबर रोजी राजापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांचाही शोध

या प्रकरणातील व्हिडिओ कोणाकडे आणि कशा प्रकारे पोहोचला, तसेच तो पुढे कोणी प्रसारित केला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला. या तपासादरम्यान व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आरोपावरून संशयित प्रणय सुधाकर जोशी (१८, रा. सागवे-नाखरेवाडी), आर्यन नरेश धुळप (१९, रा. सागवे-चिंचाडी), सिद्धेश सत्यवान कायंदेकर (२०, रा. सागवे-कात्रादेवीवाडी) आणि यश गणपत आंबेरकर (२१, रा. सागवे-कात्रादेवीवाडी) या चौघा संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ६३(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

लॉजमालकाविरोधातही गुन्हा

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी कोदवली-साईनगर पुनर्वसन वसाहतीतील मँगो लॉजचा मालक संशयित महंमद मुबारक ठाकूर याच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे प्रकरणातील तपासाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.

या प्रकरणातील संशयितांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. लवकरच खटला राजापूर न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, अल्पवयीन युवतीशी संबंधित गंभीर प्रकरणात व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांसह लॉजमालकाविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.