
कणकवली : कणकवली पोलीस स्टेशनच्या हवालदार स्मिता सचिन माने यांच्या मृत्यूप्रकरणी कुडाळ पोलीस निरीक्षकांकडून तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी स्मिता यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या दिशेनेच पोलिसांचा तपास सुरू आहे. पोस्टमार्टम केल्यानंतर व्हिसेरा राखून ठेवला असून त्याच्या अहवालानंतरच अन्य बाबी स्पष्ट होणार आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्मिता माने मृत्यु प्रकरणी सध्या तिचा पोलीस पती संशयित सचिन माने हा पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावर पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या अनुषंगानेच पोलीस आतापर्यंत तपास करत आहेत. दोघांमध्ये नेमके कोणते वाद होते, ती घरातून गेली तेव्हा काय झाले होते, ती बिडवाडी पर्यंत जंगलात कशी पोहोचली, आत्महत्येचा टोकाचा निर्णय का घेतला? अशा अनेक मुद्द्यांबाबत पोलीस तपास करत आहेत.
संशयित सचिन माने याची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान माने दांपत्याच्या लहान मुलाचा जबाबही पोलीस नोंदवणार आहेत. सध्या तरी स्मिता माने हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरूनच तपासाची दिशा आहे .जोपर्यंत व्हिसेरा अहवाल येत नाही ,तोपर्यंत आणखी काही शक्यतांचा तपास करता येणार नाही, त्यामुळे व्हिसेरा अहवालानंतरच आणखी काही बाबी याप्रकरणी स्पष्ट होण्याची शक्यता आहे .दरम्यान दोन दिवसांची पोलीस कोठडी गुरुवारी संपत असल्याने संशयित सचिन याला गुरुवारी दुपारनंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे.












