
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून सोनसाखळी चोरी व जबरी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुडाळ एमआयडीसी परिसरातून जेरबंद केले. पद्मनाभ रामचंद्र कशाळेकर (वय ४७, रा. वरची कुंभारवाडी, कुडाळ एमआयडीसी) असे संशयिताचे नाव आहे. त्याने कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्याकडून रोकड, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, हेल्मेट आणि स्प्रे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावशी-बेलनदीवाडी येथे अनिता अशोक अंधारी (वय ५०) या कुडाळला जाण्यासाठी रस्त्यावर उभ्या होत्या. यावेळी संशयिताने घावनळे मठाकडे जाणारा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना बोलण्यात गुंतवले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचून पळ काढला. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापूर्वी ९ सप्टेंबर रोजी पिंगुळी-सराफदारवाडी येथे एका वृद्ध महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावून, तिने दरवाजा उघडताच तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून मंगळसूत्र हिसकावण्यात आले होते. या दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी समांतर तपासाचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वर्णन, बोलीभाषा, वाहनाची माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला. त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
संशयिताकडून १५ हजार ५०० रुपये रोख, सुमारे दीड लाख रुपये किमतीची टीव्हीएस अपाचे आर-१६० दुचाकी, हेल्मेट आणि पेन रिलीफ स्प्रे जप्त करण्यात आला आहे. ही माहिती डॉ. दहिकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
तपास पथकाची कामगिरी
पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सदानंद राणे, डॉमनिक डिसोझा, राजेंद्र गोसावी, आशिष जामदार, अविनाश ओटवणेकर आणि अमर कांडर यांनी ही कामगिरी केली. संशयिताकडे अधिक तपास सुरू आहे.
नागरिकांची निरीक्षणे ठरली तपासात महत्त्वाची!
सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना घटनास्थळ परिसरातील सामान्य नागरिकांनी नोंदविलेली निरीक्षणे आणि दिलेली माहिती महत्त्वाची ठरली. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला दिशा मिळाली. त्यासोबतच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले, असे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सांगितले.












