
नवी दिल्ली : जर तुमची फायनांस आणि बँकिंग क्षेत्रात सुरक्षित करिअर घडवण्याची इच्छा असेल तर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) एक उत्तम संधी देत आहे. एलआयसी एचएफएल (LIC HFL) ने 'मॅनेजमेंट ट्रेनी' (Management Trainee) पदांच्या भरतीसाठी अधिकृत नोटीफिकेशन जारी केली आहे. या प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ५० हजार रुपये इतका आकर्षक सुरुवातीचा पगारही मिळेल. अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने 'मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग आणि सेल्स)' या ५० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवार एमबीए पदवीधारक असणे गरजेचे आहे. निवड झाल्यानंतर उमेदवारांना 1 वर्षांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून एमबीए पदवी असणे अनिवार्य आहे. उमेदवारांकडे सेल्स आणि फील्ड सेल्स, बिझनेस डेव्हलपमेंट, क्लायंट रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि वाटाघाटी कौशल्ये यांसारख्या क्षेत्रांत ० ते १ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
अर्जदार हा एलआयसी एचएफएलने निश्चित केलेल्या ३५ शहरांपैकी कोणत्याही एका शहराचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. या शहरांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, दिल्ली, गुडगाव, गाझियाबाद, चंदीगड, डेहराडून, कानपूर, सोनीपत, लुधियाना, जयपूर, जोधपूर, भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर (पश्चिम), रायपूर, पाटणा, रांची, कोलकाता, भुवनेश्वर, कटक, गुवाहाटी, त्रिपुरा, बेंगळुरू, म्हैसूर, हैदराबाद, विजयवाडा, चेन्नई, कोईम्बतूर, मदुराई किंवा एर्नाकुलमचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील स्थानिक भाषा बोलता आणि समजता येणे आवश्यक आहे.
हा एक वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. प्रशिक्षण कालावधीत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ४० हजार रुपये ते ५० हजार रुपये इतका स्टायपेंड (वार्षिक पॅकेज ₹४.८ लाख ते ₹६ लाख) मिळेल. एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि कंपनीच्या धोरणांनुसार जर तुमची कायमस्वरूपी पदावर नियुक्ती झाली तर तुमचे वार्षिक वेतन पॅकेज (CTC) १४ लाख रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.
पद भरतीसाठी अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम, एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (lichousing.com) या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होमपेजवरील करिअर्स सेक्शनमध्ये जा आणि मॅनेजमेंट ट्रेनीजच्या भरतीविषयक लिंकवर क्लिक करा. तुमची माहिती भरून नोंदणी करा आणि अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करा. निर्धारित अर्ज शुल्क ऑनलाइन भरा, त्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.














