LIVE UPDATES

पडेल मच्छी मार्केटमधून ४० हजारांची दुचाकी चोरीला

गाडीला चावी ठेवल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने केली चोरी; विजयदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 13, 2026 20:46 PM
views 50  views

देवगड : पडेल येथील मच्छी मार्केट परिसरातून मासे विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्याची सुमारे ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी अनंत भिकाजी राननाक यांनी विजयदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनंत राननाक हे आपली होंडा शाईन एसपी (क्रमांक MH 07 AF 8201) ही दुचाकी घेऊन पडेल मच्छी मार्केट परिसरात आले होते. त्यांनी आपली दुचाकी तेथे उभी केली होती. यावेळी दुचाकीची चावी गाडीला असल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरून नेली. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर राननाक यांनी परिसरात शोध घेतला. मात्र, दुचाकीचा शोध न लागल्याने त्यांनी विजयदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ब) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास विजयदुर्ग पोलीस करीत आहेत.