
पिंपरी : निगडीजवळील एका भागात एका दुचाकीला मागून दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने भोसरी येथील बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. हा अपघात रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झाला. या दुर्देवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपघातात मृत बहीण-भावाच्या कुटुंबाने १७ वर्षीय बहिणीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी रात्री निगडीतील 'पुणे गेट हॉटेल'जवळ घडला. बहीण-भाऊ घोरावेश्वरवरून परतत असताना एका दुचाकीने त्यांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघातात ऋषिता मुल्या (वय १७) आणि कौशिक मुल्या (वय २१, दोघेही रा. इंद्रायणीनगर भोसरी) यांचा मृत्यू झाला आहे.
दोघेही भोसरीतील इंद्रायणी नगरमध्ये राहत होते. त्यांचे वडील रवी मुल्या हे शिवणकाम करतात. ते इंद्रायणी नगर मिनी मार्केटमध्ये काम करतात. अपघातानंतर कौशिकला आधी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर इंद्रायणी नगरमधील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. कौशिक आळंदी येथील एका महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकत होता, तर ऋषिता इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी होती.
ऋषिताला त्याच रात्री बाणेरमधील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी ती 'ब्रेन डेड' असल्याचे आणि उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले. ऋषिता 'ब्रेन डेड' असल्याचे घोषित केल्यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.













