LIVE UPDATES

महिला पोलीस मृत्यू प्रकरणी अखेर पती सचिन मानेला अटक

रात्री ८.४५ वाजता अटक उद्या करणार न्यायालयात हजर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 12, 2026 22:54 PM
views 97  views

कणकवली : दोन दिवसांपासून बेपत्ता असल्यानंतर बिडवाडी - हुंबरणे येथील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळलेल्या कणकवली पोलीस ठाण्याच्या हवालदार स्मिता माने यांच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल असलेला त्यांचा पती तथा पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने याला अखेर आज सोमवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास अधिकृतरित्या अटक करण्यात आली आहे. त्याला उद्या मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

बेपत्ता असलेल्या स्मिता माने यांचा मृतदेह रविवारी दुपारच्या सुमारास बिडवाडी - हुंबरणे येथील जंगलमय भागात, झाडाच्या फांदीला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. त्यानंतर स्मिता यांची बहीण हिने दिलेल्या तक्रारीनुसार स्मिता हिचा नवरा सचिन माने यांच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सचिन याने स्मिता यांचा शारीरिक, मानसिक छळ केला, त्यामुळेच स्मिता यांनी आत्महत्या केली किंवा सचिन यांनीच घातपाताने स्मिता यांना ठार केले असावे, असे स्मिता यांच्या बहिणीने फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार सचिन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एकीकडे स्मिता यांचा मृतदेह विच्छे देण्यासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अद्यापही शवविच्छेदन झालेले नाही. मात्र पोलिसी तपासातून मिळालेल्या माहितीनंतर अखेरीस सचिन माने याला अटक करण्यात आली आहे.