LIVE UPDATES

चिपळूणमध्ये भाजपची मोठी राजकीय मुसंडी

मार्कंडी, शंकरवाडी व ओझरवाडीतील शेकडो तरुणांचा पक्षात जाहीर प्रवेश
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 14, 2026 11:40 AM
views 57  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

चिपळूण: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयानंतर चिपळूण शहरात भारतीय जनता पार्टीने पक्षविस्ताराचा झंझावात कायम राखला असून मार्कंडी, शंकरवाडी तसेच ओझरवाडी परिसरातील असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. 

भाजप नगरसेवक तथा अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप भिसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि प्रयत्नांतून हा पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला असून, रविवारी सायंकाळी स्वामींनी निवासस्थानी आयोजित विशेष सोहळ्यात रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सर्व नवप्रवेशी तरुणांचे पक्षात स्वागत करून त्यांना योग्य सन्मान व जबाबदारी देण्याची ग्वाही दिली.

वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्याकडे रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याची धुरा आल्यानंतर त्यांनी तालुक्यात पक्षसंघटन बळकट करण्यावर भर दिला होता. नगरपरिषद आणि जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये पक्षाने मिळवलेले नेत्रदीपक यश त्यांच्या संघटनकौशल्याची पोचपावती ठरले असून, आता पक्षाची ध्येयधोरणे आणि विकासकामांवर विश्वास ठेवून तरुण वर्ग मोठ्या संख्येने भाजपकडे आकर्षित होत आहे. 

नगरसेवक संदीप भिसे यांनी शहरात उभे केलेले मजबूत युवा नेटवर्क आणि प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर निष्ठा व्यक्त करत स्थानिक तरुणांनी हा राजकीय निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

या पक्षप्रवेश सोहळ्याला उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर, गटनेते शशिकांत मोदी, जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य स्वप्ना यादव, आरोग्य सभापती शुभम पिसे, महिला व बालकल्याण सभापती रसिका देवळेकर, चिटणीस अनिल सावर्डेकर, स्वानंद रानडे, जतिन घटे, अर्बन बँक संचालक रत्नदीप देवळेकर, मंडल उपाध्यक्ष नरेंद्र बेलवलकर, राकेश दाते, चव्हाण, अभिषेक साळुंखे, सर्वेश सुर्वे, दिनेश लटके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

याप्रसंगी रवींद्र तटकरे, पप्पू चौगुले, राम चौगुले, श्रीराम गोलमाडे, अविनाश तटकरे, संतोष जाधव, विजय यादव, हनुमान शिंदे, हरीश मोहिते, विलास राठोड, शेखर गोदीस, बाळू शिंदे, हेमंत दाभाडे या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो तरुणांनी हातात कमळ घेत पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद अधिक भक्कम मानली जात आहे.